प्रतिनिधी/ खेड
दुबईतून आलेल्या अलसुरे येथील व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेल्यानंतर हादरलेल्या प्रशासनाने शहरातील डाकबंगल्यासह 5 गावांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर केला आहे. डाकबंगल्यासह पाच गावांतील सर्व्हेक्षणासाठी आरोग्य विभागाने तैनात केलेल्या 17 पथकांमध्ये आणखी 9 पथकांचा समावेश करण्यात आला आहे. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आणखी 16 जणांची भर पडल्याने ही संख्या 37 वर जावून पोहोचली आहे. मृत व्यक्ती 60 हून अधिक जणांच्या संपर्कात आल्याची माहिती पुढे आली असून संपर्कातील व्यक्तींची युध्दपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, दुसऱया दिवशीही शुक्रवारी अत्यावश्यक दुकाने बंदच होती.
आयसोलेशनमधील 39जण निगराणीखाली
अलसुरेतील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांसह कळंबणी उपजिल्हा रूणालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच एक खासगी डॉक्टर व अन्य नागरिक अशा 21 जणांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यात आणखी 16 जणांची भर पडली असून यात शिव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱयांचाही समावेश आहे. या सर्वांच्या स्वॅबचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
17 आरोग्य पथकांमध्ये आणखी 9 पथकांची भर
50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या तालुका आरोग्य विभागाने पाच गावांसह शहरातील डाकबंगला परिसरातील सर्व्हेक्षणासाठी तैनात 17 आरोग्य पथके तैनात केली. पथकातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, आशा, मदतनीस, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदीमार्फत गुरूवारी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणांतर्गत 400हून अधिकजणांची तपासणी करण्यात आली. अलसुरे, भोस्ते, कोंडिवली, मोरवंडे, निळीक या पाच गावांमध्ये 6 हजारांहून अधिक लोकसंख्या असल्याने आणखी 9 आरोग्य पथकांचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल 26 आरोग्य पथकांमार्फत सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूर यांनीही येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
मृत व्यक्ती 60हून अधिकजणांच्या संपर्कात
दुबईतून परतल्यानंतर ही व्यक्ती अलसुरे येथे आई-वडील, पत्नी व तीन मुलांसह रहात होती. याच गावात त्या मृत व्यक्तीचे सासू-सासरेही राहतात. अलसुरे येथे रहात असताना त्यांच्यासह गावांतील अन्य ग्रामस्थांनीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. यानंतर ही व्यक्ती पत्नी व तीन मुलांसह शहरातील डाकबंगला परिसरातील फ्लॅटवर रहात होती. डाकबंगला येथे रहात असताना अनेकदा बाजारातही ही व्यक्ती दुचाकी व रिक्षाने फिरत होती. यामुळे मृत व्यक्ती 60 हून अधिकजणांच्या संपर्कात आल्याची माहिती पुढे आली आल्याने प्रशासनावरील ताण आणखी वाढला आहे. प्रशासनाकडून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम युध्दपातळीवर सुरू आहे.
अलसुरेसह पाच गावांतील भय कायमच
या व्यक्तीचा कोरोना मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर अलसुरेसह अन्य पाच गावांमध्ये पसरलेली भयाण शांतता अजूनही कायमच असूनही ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच आहेत. प्रशासनाकडून पाच गावांमध्ये कन्टेनमेंट जाहीर करण्यात आल्याने कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. पंचक्रोशीतील सर्वच ठिकाणचे छोटे-मोठे मार्ग अडवण्यात आले असून ठिकठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली असून दिवस-रात्र कार्यरत असणाऱया पोलीस यंत्रणेकडून प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
भडगाव-खेंडे परिसरातही बफर झोन
व्यक्तीच्या कोरोना मृत्यूनंतर शहरातील डाकबंगला परिससर सील करण्यात आला असून या ठिकाणी जाणारे सर्व मार्ग अडवण्यात आले आहेत. येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास अटकाव करण्यात आला आहे. या परिसरातही तीन कि.मी. अंतरापर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या पाठोपाठ डाकबंगला परिसरापासून काही अंतरावर असलेल्या भडगाव-खोंडेतही बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणीही सर्व मार्ग ‘लॉक’ करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई
कोरोनाने झालेल्या मृत्यूनंतर येथील नगर परिषदेने शहरातील डाकबंगला परिसरावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मृत व्यक्ती डाकबंगला परिसरात काही दिवस वास्तव्यास होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तरीही परिसरात जाण्याच्या प्रयत्न करून मनाई आदेशाचे कोणीही उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे फलक परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मृत व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात आला आहे. त्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुसऱया दिवशीही अत्यावश्यक सेवांची दुकाने बंदच
शहरातील शिवाजी चौकातून बाजारपेठेकडे जाणारा मुख्य मार्गही ‘लॉक’ करण्यात आला आहे. कोरोना मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी शहर व्यापारी संघटनेने 12 एप्रिलपर्यंत किराणा मालाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शुक्रवारी दुसऱया दिवशीही अत्यावश्यक सेवांची दुकानेही बंदच होती. यामुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
आणखी एका खासगी डॉक्टरकडे एक तास वावर? अलसुरे येथील कोरोनाचा बळी ठरलेली ही व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, याची कसून चाचपणी आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ‘त्या’ खासगी डॉक्टरच्या दवाखान्यात ही व्यक्ती असताना कोणकोणते रूग्ण उपचारासाठी आले होते, याची शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीअंती त्या दरम्यान चौघांनी उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या व्यक्तीचा आणखी एका खासगी रूग्णालयात 1 तास वावर होता, अशीही विश्वसनीय माहिती पुढे आली असून त्या दृष्टीने चाचपणी सुरू झाल्याचे समजते.