प्रशासकीय यंत्रणांच्या चिंतेत वाढ, ग्रामस्थही धास्तावले
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील तळे-चंदनवाडी येथील एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांच्या चिंतेत वाढ झाली असून ग्रामस्थही धास्तावले आहेत. यापाठोपाठ वरवली-धुपेवाडी, दयाळ-खेराडेवाडी येथील दोघे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून संपर्कातील अन्य व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
तालुक्यातील तळे-चंदनवाडी येथील रहिवाशी असलेले व मुलुंड-मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघेजण 20 मे रोजी गावी आले होते. हे चौघेजण गावी पोहचल्यानंतर त्यांना ताप आला. याबाबत गावातील प्रमुख व्यक्तींनी आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. 21 रोजी सर्वांचे स्वॅबचे नमुने घेवून तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री अहवाल प्राप्त झाले असून चौघेही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होताच प्रशासकीय यंत्रणांची झोप उडाली आहे.
कोरोनाबाधितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रामस्थांचीही धास्ती वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून हे गाव सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरवली-धुपेवाडीतील कोरोनाबाधिताच्या कुटुंबातीलच 55 वर्षीय प्रौढाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आल्याने गावात खळबळ उडाली आहे. ठाणे येथून आलेल्या 18 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील 55 वर्षीय प्रौढास कोरोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील दयाळ-खेराडेवाडी येथील 60 वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. हा वृद्ध ठाणे-मुंबई येथून गावी आला होता. वृद्धास कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन करून स्वॅबचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले होते. हा वृद्ध कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. सोमवारी तातडीने त्याच्या कुटुंबातील 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा शोध जारी आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 22 वर पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासन हतबल झाले आहे.