प्रतिनिधी / खेड
शहरातील डाकबंगला येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार फ्लॅट फोडून पोलिसांची झोप उडवली आहे. अन्य तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसले तरी एका फ्लॅटमधून ४७ हजाराची रोकड चोरट्यांनी लांबवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डाकबंगला येथे अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळच्या सुमारास फ्लॅट फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मालकांना एकच धक्का बसला. ही बाब पोलीस स्थानकात कळवल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. एका फ्लॅटमधून ६७ हजाराची रोकड चोरल्याच्या हाती लागली. अन्य फ्लॅटमध्ये मात्र चोरल्याना रिकाम्या हातीच परतावे लागले.
याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात तक्रार देण्याचे काम सुरू होते. सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपावलीची धामधूम सुरू असून अनेक फ्लॅट बंद आहेत. हीच संधी साधून चोरटे डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच दिवशी चोरट्यांनी चार फ्लॅट फोडून पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. दरम्यान, शहरात घरफोड्या वाढत चालल्या असून नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच गजबजलेल्या सोसायटी व फ्लॅटच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन नगरपरिषदेने ध्वनीवर्धकाद्वारे केले आहे.