प्रतिनिधी/ खेड
पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवून देते, असे सांगून तालुक्यातील चिंचघर-प्रभुवाडी येथील सीताराम जाधव यांची 73 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात विजय पवार या संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव हे किराणामालाच्या दुकानात कामास आहेत. संशयित विजय पवार याने त्यांच्या मोबाईलवर फोन करून पंतप्रधान मुद्रा योजनेतून 5 लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत कर्जाची प्रोसेसिंग फी व इतर कारणांसाठी गुगल पेद्वारे 73 हजार रूपये ऑनलाईन भरून घेतले. एवढे करूनही कर्ज मंजूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच सीताराम जाधव यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली.