खेड/प्रतिनिधी
खेड तालुक्यातील सुकिवली बौध्दवाडी येथे येथील पोलिसांनी धाड टाकून 98 हजार 840 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी आकाश विजय जाधव याच्यासह अन्य एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर फरारी साथीदार अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा वय-५० वर्षे, रा. सुकिवली, बौध्दवाडी याचा शोध सुरू आहे.
बौद्धवाडी येथे गांज्या सारख्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने ही कारवाई केली. धाडीत १ किलो ४८८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.