प्रतिनिधी/ खेड
शहरात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव सुरूच असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी नगर प्रशासन सर्वेक्षणासह प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर देत आहे. मात्र गेल्या 20 दिवसांत डेंग्यूचे 52 रूग्ण आढळल्याची माहिती पुढे आली आहे.
शहरात उद्भवलेल्या डेंग्यूच्या साथीची जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी गंभीर दखल घेत प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली. यामुळे डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले. नगर प्रशासनाने गेल्या 20 दिवसांपासून डासप्रतिबंधक फवारणीसह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती याद्वारे साथ नियंत्रणात आणण्यासाठी नगर प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र डेंग्यूचे नवे रूग्ण आढळत असल्याने नगर प्रशासनाची धास्ती वाढली आहे. डेंग्यूचा रूग्ण आढळल्यास तातडीने उपचार करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकारी पाटील यांनी दिल्या आहेत.