खेड शहर भाजपने न.प.च्या प्रवेशद्वाराजवळ वाटले पेपर,
प्रतिनिधी/ खेड
खेड नगरपरिषदेच्या तिजोरीतील खडखडाटामुळे दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱया प्रिंटींग पेपरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे दाखल्यांसह अन्य कामकाजासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करत विकतचे प्रिंटींग पेपर आणावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे व पदाधिकाऱयांनी बुधवारी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांना चक्क प्रिंटींग पेपरचे वाटप केले.
खेड नगरपरिषदेच्या तिजोरीचे तीनतेराच वाजले आहेत. डिझेलअभावी स्वच्छता विभागाची वाहने जागेवरच उभी होती. पाण्याच्या टँकरच्या दुरूस्तीसाठी पैसेच नसल्याने हा टँकर देखील जागेवरच उभा होता. स्वच्छता विभागातील वाहने डिझेलअभावी जागेवरच उभी असल्याची बाब समजताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी नगरपरिषदेस कोरा धनादेश सुपूर्द करत अनोखे आंदोलन छेडले होते.
या पाठोपाठ नगरपरिषदेत येणाऱया नागरिकांनाच बाहेरून पेपर विकत आणून द्यावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर भाजपने नागरिकांना दाखल्यांसाठी प्रिंटींग पेपरचे वाटप केले. याशिवाय प्रिंटींग पेपरचा गठ्ठा नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱयांकडे सुपूर्द केला. प्रिंटींग पेपरअभावी नागरिकांची गैरसोय होवू न देण्याचे सूचित करत आणखी प्रिंटींग पेपर लागल्यास तातडीने संपर्क करण्याच्या सूचनाही कानडे यांनी अधिकाऱयांना केल्या.
नागरिकांकडून करवसुली करणाऱया नगरपरिषदेत दाखल्यांसाठी प्रिंटींग पेपर नसणे, ही खेदजनकच बाब असून नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठीच पेपरचे वाटप केल्याचे अनिकेत कानडे यांनी सांगितले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात ताळमेळ नसल्यामुळेच नगरपरिषदेवर ही नामुष्की ओढवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहर भाजप जनतेच्या कटिबद्ध असून नागरिकांची गैरसोय खपवून घेणार नसल्याचे अनिकेत कानडे यांनी ठणकावले आहे. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय बुटाला, भूषण काणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.