प्रतिनिधी/ खेड
खेड पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झालेला असतानाच येथील नगर परिषदेतही कोरोनाने एन्ट्री केली आहे. शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱयांसह मुख्याधिकाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन शासकीय अधिकाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांची चिंता वाढली आहे. दोन दिवसात 14 जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनाबाधितांची संख्या 615 वर जाऊन पोहोचली आहे.
तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून ऐन गणेशोत्सवात झपाटय़ाने वाढणाऱया कोरोनाबाधितांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासकीय यंत्रणांची धास्तीही वाढत चालली आहे. 6 दिवसांपूर्वीच पंचायत समितीच्या सभापतींसह स्विय सहाय्यक व वाहनचालकास कोरोनाची बाधा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. खबरदारी म्हणून आठवडाभर पंचायत समिती कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 10 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत प्रशासकीय कामकाज सुरू आहे.
पंचायत समिती सभापतींच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आहे. गटविकास अधिकाऱयांना झालेल्या कोरोनामुळे पंचायत समितीच्या कार्यालयातील प्रवेशबंदीचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे अन्य कर्मचाऱयांचे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती कार्यालयापाठोपाठ येथील नगर डपरिषदेतही कोरोनाची एन्ट्री झाल्याने सारेच धास्तावले आहेत. मुख्याधिकाऱयांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नगर परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्याधिकाऱयांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यासाठी यंत्रणांची धावाधाव सुरू होती. यापूर्वी नगर परिषदेतील 4 कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली होती. नगर प्रशासनाने तातडीने कार्यालयात नागरिकांना येण्यास मज्जाव करत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर दिला होता. पंचायत समिती, नगर परिषदेपाठोपाठ पोलीस स्थानकातही कोरोनाने शिरकाव केला आहे. चारच दिवसापूर्वी 2 महिला पोलीस कर्मचाऱयांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही कोरोनाचे रूग्ण झपाटय़ाने वाढत असल्याने नगर प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे.
दरम्यान, गेल्या 2 दिवसात 14जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 21 ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार शहरातील 4, वेरळ, भडगाव, कर्टेल, चिंचघर येथील प्रत्येकी 1 तर 22 रोजीच्या अहवालानुसार 6जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 615 वर पोहोचली असून आतापर्यंत 17जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 428जणांनी कोरोनावर मात केली आहे.
.