प्रतिनिधी / खेड
वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बेदकारपणे वाहन चालवण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात येथील पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शनिवारी राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत ५० हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या धडक कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा पुढे सरसावली आहे. कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने तोंडाला मास्क न लावताच वाहने हाकणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, वाहनांना नंबर प्लेट नसणे, विनापरवाना वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेणे यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे.
शहरातील मुख्य मार्गावर कोणत्याही क्षणी पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असल्याने साऱ्यांनीच धसका घेतला आहे. शनिवारी राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत ५० हून अधिक जण कारवाईच्या कचाट्यात अडकले. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नंदकुमार घाणेकर, पोलीस कर्मचारी प्रकाश पवार, राहुल कोरे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.