प्रतिनिधी/ खेड
शहरातील बाजारपेठेत आढळलेल्या कोरोनाबाधितांमुळे वाणीपेठपासून गांधीचौकापर्यंत कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अर्धी बाजारपेठ कन्टेन्मेंट झोनच्या वेढय़ात अडकली आहे. दोन दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राहत असलेल्या ठिकाणापासून विश्वास स्टोअर्सपर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. याठिकाणच्या परिसरातील बाजारपेठही कन्टेन्मेंट झोनच्या विळख्यात अडकल्याने बाजारपेठ खुली होऊनदेखील सर्वत्र शांततेचे वातावरण आहे.
शहरातील वाणीपेठ व कुंभारआळी, नगर परिषद कर्मचारी वसाहत येथील प्रत्येकी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी एकविरा नगर परिसरातील तिघांना कोरोनाची बाधा झाली होती. या कोरोनाबाधितांमुळे एकविरानगरसह वाणीपेठ, बाजारपेठ, हनुमानपेठ, गांधीचौक परिसरासह नगर परिषद कर्मचारी वसाहत परिसरात कन्टेन्मेंट झोन लागू करून परिसरात जाणारे मार्ग अडवण्यात आले आहेत. या कन्टेन्मेंट झोनमुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.
‘ब्रेक द चेन’ लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर चक्राकार पद्धतीने दुकाने खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र अवघी बाजारपेठ कन्टेन्मेंट झोनच्या विळख्यात अडकल्याने व्यापाऱयांसह छोटय़ा-मोठय़ा दुकान व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. कोरोनाबाधित क्षेत्रात केवळ मेडिकल दुकाने खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. सोमवारपासून जिह्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या असल्या तरी शहरातील बाजारपेठेत मात्र सुनसानच आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयास कोरोनाची बाधा झाल्याने सारे भयभीत झाले आहेत. यात कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. या अहवालाकडे साऱयांच्या नजरा खिळल्या आहेत. हा पदाधिकारी राहात असलेल्या ठिकाणापासून विश्वास स्टोअर्सपर्यंतच्या परिसरात सोमवारपासून कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील दुकानेही कन्टेन्मेंट झोनच्या विळख्यात अडकल्याने येथेही सन्नाटा आहे.
मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने अनेक व्यावसायिकांनी तीनबत्तीनाकापासून एस.टी. स्टॅण्डपर्यंत असलेल्या मोकळय़ा गाळय़ांमध्ये दुकाने थाटण्यास सुरूवात केली आहे. भाजी विपेते, फळ व्यावसायिक व अन्य हातगाडी व्यावसायिकांनी रस्त्यालगतच्या मोकळय़ा जागेत दुकाने थाटली आहेत. या मार्गावर ग्राहकांची वर्दळ सुरू असून काहीठिकाणी वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. नगर प्रशासनाच्या भरारी पथकाकडून या मार्गावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.