प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील चाटव येथे मृतावस्थेत आढळलेल्या कावळय़ाचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच रेल्वेस्थानक परिसरात 3 कावळे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तीनही कावळे उत्तरीय तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी सांगितले. या तीनही कावळय़ांची प्राथमिक तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे.
रेल्वेस्थानक परिसरात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱया काही नागरिकांच्या दृष्टीस 3 कावळे मृतावस्थेक्त दिसले. या बाबत तातडीने पशुधन विभागाच्या कर्मचाऱयांना कळवण्यात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतावस्थेतील तीनही कावळय़ांना तपासणीसाठी पशुधन कार्यालयात आणण्यात आले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर तीनही कावळे अधिक तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तालुक्यातही कावळय़ांसह अन्य पक्षी मृतावस्थेत आढळत असल्याने पशुधन विभागासह पक्षीप्रेमीही सतर्क झाले आहेत. मृतावस्थेत आढळणाऱया पक्ष्यांना कोणी हात न लावता व कुठेही पक्षी मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आल्यास विल्हेवाट न लावता थेट पशुधन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी केले आहे.