चुये / प्रतिनिधी :
खेबवडे तालुका करवीर येथे मुसळधार पावसाचा तडाखा बसून घराची भिंत कोसळली. यामध्ये दोन दुभती जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. त्यामुळे 3 लाखांच्या नुकसानीचा फटका या दूध उत्पादक शेतकऱ्याला बसलेला आहे.
गेले दोन दिवस मुसळधार स्वरूपात कोसळणाऱ्या पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी खेबवडे तालुका करवीर येथील शंकर पाटील यांची घराची भिंत दिनकर पाटील यांच्या मालकीच्या जनावारांच्या गोठ्यावर कोसळल्यामुळे त्या भिंतीखाली सापडून दोन दूभती जनावरे गंभीररित्या जखमी झालेली आहेत. भिंत कोसळल्यामुळे पाटील यांचा जनावरांचा गोठा जमीनदोस्त झाला त्यामुळे त्यांचे तीन लाखापर्यंतचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
गावचे उपसरपंच सुयोग वाडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन ग्रामसेवक शब्बीर मुजावर ,पोलीस पाटील उज्वला ताडे मॅडम पशुवैद्यकीय अधिकारी वडगावे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.
भिंत कोसळून दोन जनावरे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समजताच गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील संचालक शशिकांत पाटील चुयेकर, संचालक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले व गंभीर जखमी झालेल्या जनावरांच्या वरती तात्काळ उपचार सुरू करण्याचे आदेश त्यांनी गोकुळच्या पशु वैद्यकीय अधिकार्याना दिले.