नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कारांसाठी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणारे भारताचे बॅडमिंटनपटू बी. साई प्रणित आणि किदांबी श्रीकांत यांच्या नावांची अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे या संघटनेतर्फे अन्य तीन बॅडमिंटनपटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.2019 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा भारताचा एकमेव पुरूष बॅडमिंटनपटू टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. एच.एस. प्रणॉय, प्रणव जेरी चोप्रा आणि समीर वर्मा यांची अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे. द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी एस. मुरलीधरन व भास्कर बाबु यांची शिफारस करण्यात आली आहे.
‘खेलरत्न’ पुरस्कारांसाठी कोनेरू हंपीची शिफारस
चेन्नई : भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कारांसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने भारताची महिला बुद्धिबळपटू 34 वर्षीय कोनेरू हंपीची शिफारस केली आहे.
कोनेरू हंपी ही विश्व महिलांच्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतील विद्यमान विजेती असून ती सध्या महिला बुद्धिबळपटूंच्या मानांकनात तिसऱया स्थानावर आहे. पुढील वर्षी होणाऱया फिडेच्या महिलांच्या कँडीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोनेरू हंपी पात्र ठरली आहे. 2020 साली झालेल्या ऑनलाईनवरील बुद्धिबळ ऑलिंपियाड जिंकणाऱया भारतीय बुद्धिबळ संघामध्ये हंपीचा समावेश होता.