भारतीय क्रीडा प्राधिकरणने दिला पहिल्या तिमाहीचा भत्ता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खेलो इंडियामध्ये भाग घेतलेल्या 2749 क्रीडापटूंच्या खात्यात प्रत्येकी 30,000 रुपये अतिरिक्त भत्ता जमा केला असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) रविवारी सांगितले. एकूण 8.25 कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘या ऍथलीट्सच्या बँक खात्यात 22 मे रोजी सदर रक्कम जमा करण्यात आली आहे. एकूण 2893 ऍथलीट्सना हा अतिरिक्त भत्ता (ओपीए) देण्यात येणार असून उर्वरित 144 ऍथलीट्सना या महिन्याच्या अखेरीस ही रक्कम देण्यात येणार आहे,’ असे साईने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 2020-21 या पहिल्या तिमाहीसाठी हा भत्ता देण्यात आलेला आहे. या भत्त्यामध्ये प्रवास खर्च, निवासस्थानी असताना भोजनाचा खर्च तसेच खेळाडूंना करावा लागणारा इतर खर्च यांचा समावेश आहे.
देशातील 35 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 21 क्रीडा प्रकारात भाग घेतलेल्या ऍथलीट्सना हा भत्ता देण्यात आला असून त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 386 ऍथलीट्सचा समावेश आहे. त्यानंतर हरियाणाच्या 381, दिल्लीच्या 225, पंजाबच्या 202, तामिळनाडूच्या 165 ऍथलीट्सचा समावेश आहे. ओपीए स्वरूपात प्रतिवर्षी 1.20 लाख रुपये खेळाडूंना देण्यात येतात. खेलो इंडियातर्फे दिल्या जाणाऱया 6.28 लाख रुपये शिष्यवृत्तीचा हा एक भाग असून या योजनेखाली निवडलेल्या ऍथलीट्सना तो देण्यात येतो.