वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशमधील भोपाळमधील रविवारी समाप्त झालेल्या 2022 च्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचे सर्वंकश अजिंक्यपद महाराष्ट्राने पटकाविले. महाराष्ट्राने या स्पर्धेत 56 सुवर्ण, 55 रौप्य आाि 50 कास्यपदकांची कमाई केली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचा धावपटू जयवीर मोटवाणी तसेच पंजाबची जस्नूर कौर यांनी जलतरण या क्रीडा प्रकारात अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या विभागात वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला.
या स्पर्धेत हरियाणा संघाने 40 सुवर्णपदकांची कमाई करत दुसरे स्थान तर यजमान मध्यप्रदेशने 39 सुवर्णपदकांसह तिसरे स्थान मिळवले. रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय माहिती, प्रसारण तसेच युवा क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुरासिंग ठाकूर त्याचप्रमाणे मध्यप्रदेशच्या क्रीडा युवजन खात्याच्या मंत्री यशोधरा राजे सिंधिया, त्याचप्रमाणे मध्यप्रदेशच्या क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा 13 दिवस चालली होती. ही स्पर्धा मध्यप्रदेशने मोठ्या प्रमाणात यशस्वी केली.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जलतरण या क्रीडा प्रकारात 8 सुवर्णपदकांसाठी तर कुस्ती या क्रीडा प्रकारात 5 सुवर्णपदकांसाठी लढती झाल्या. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जलतरण या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम राखताना 8 पैकी 3 सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या जयवीर मोटवाणीने मुलांच्या 50 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक घेतले. तर महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिसने मुलींच्या 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारात एकूण 14 सुवर्णपदकांसह 26 पदकांची कमाई केली तर कर्नाटकाने या क्रीडा प्रकारात दुसरे स्थान मिळवताना सहा सुवर्णपदकांसह 25 पदके मिळवली.
कुस्ती या क्रीडा प्रकारात शेवटच्या दिवशी दिल्लीच्या मल्लांनी आपले वर्चस्व ठेवताना पाच पैकी 3 सुवर्णपदके मिळवली. दिल्लीच्या रमनदीपने मुलांच्या 92 किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक मिळवताना दिल्लीच्या हरदीप राठीचा पराभव केला. दिल्लीच्या महिला मल्ल नेहा शर्मा आणि शिक्षा यांनी विविध वजन गटात सुवर्णपदके मिळवली. हरियाणाच्या सचिन मोरने 80 किलो गटात तर राजस्थानच्या ललितकुमारने 55 किलो गटात सुवर्णपदके घेतली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 25 नवे राष्ट्रीय स्पर्धाविक्रम नोंदवले गेले. या स्पर्धेत एकूण 27 क्रीडा प्रकार खेळवले गेले. सदर स्पर्धा मध्यप्रदेशमधील भोपाळ, इंदोर, उजैन, माहेश्वर, बालाघाट, मंडला, जबलपूर आणि ग्वाल्हेर या शहरांमध्ये घेतली होती.