रजीनीश गांवकर आले विद्यार्थ्यांच्या मदतीला
ब्रिजेश देयकर / मडगाव
कोरोना व्हायरसमुळे आज मुलांना विद्यालयात जाऊन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची परवानगी दिलेली आहे. पण, ग्रामीण भागातील कित्येक मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यात नेटवर्कच्या समस्यातून जावे लागत आहे. खोतीगाव येथील मुलांना नेटवर्कच्या समस्यामूळे शिक्षण घेण्यापासून कोणतीही अडचण भासू नये यासाठी काणकोण खोतीगाव-महालबड्डे येथील रजीनीश गावकर यांनी स्वताच्या दुकानावर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध केलेली आहे.
जेव्हा ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा, या भागातील मुले नेटवर्कच्या शोधात रानात जात होती. हे बघून खुपच दुख वाटत होते. शिक्षण हे प्रत्येक मुलाला जगण्याची नवीन दिशा दाखवते. त्यामूळे विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफाय sसुविधा देण्याचे ठरवले. मुलांनी या सुवीधाचा फायदा घेऊन आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी. दहावी व बारावीची मिळून अंदाजे 20 मुलांना या सुविधाचा लाभ होत आहे. तसेच आता प्रथम वर्षमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता मुलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन द्यावे लागत आहे. अशा मुलांना सुद्धा याचा फायदा होत आहे. तसेच या भागात ‘आयडिया’ या कंपनीचा टॉवर असून देखील त्यांना नेटवर्क मिळत नाही. जर या टॉवरला नेटवर्क मिळाला असता तर आज या मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास त्रास झाले नसते. तसेच या भागात आरोग्य संदर्भात कोणताही वाईट प्रसंग घडला तर रुग्णवाहिकेशी संपर्क साधू शकत नाही. असे, रजीनीश गावकर यांनी सांगितले.
नेटवर्क मिळविण्याकरिता 20 की. मी. दूर जावे लागते
या भागातील लोकांना नेटवर्क मिळविण्याकरीता खुपच कसरत करावी लागते. काहींना नेटवर्कच्या शोधात जंगलात जावे लागते. जर कुणलाही फोन करायचा असेल तर खोतीगाव येथून पर्तगाळी येथे जावे लागते. खोतीगाव येथून पर्तगाळी 20 कि. मी. च्या दूरीवर आहे. मोबाईलचा नेटवर्क हा अत्यावश्यक सेवेतील एक भाग झालेला आहे. कारण, आता सर्व कामे मोबाईलवर होऊ शकतात. त्यामूळे लोकप्रतिनिधींनी शिक्षणाकडे व गावातील समस्याकडे राजकारण न करता त्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी या भागातील नेटवर्कच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करावा. अशी विनंती रजीनीश गावकर यांनी यावेळी केली.
रजीनीश गावकर यांनी जेव्हा पासून मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आम्हाला ऑनलाईन शिकवणीचा लाभ घेता येतो. अन्यथा आम्हाला नेटवर्क शोधायला जाण्याची पाळी आली असती. जरी कोरोना व्हायरसमूळे शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची सुरुवात केली असली तरी आम्हाला शाळेत जाऊन शिक्षण घ्यायला आवडले असते अशी प्रतिक्रीयाखोतीगाव सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थी व्यंकेश गावकर यांनी व्यक्त केली आहे.