तरुण भारत वृत्ताची दखल : वाहनधारकांतून समाधान
प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे शहरात लाखो रुपये खर्चून नवीन काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. दुसरीकडे याच काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात येत असल्याने रस्त्यांची दुर्दशा होत आहे. अशाप्रकारे जुन्या पी. बी. रोडवर डेनेज दुरुस्ती, चक्क नवीन काँक्रीटचा रस्ता खोदण्यात आल्याचे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली असून तातडीने खोदलेल्या रस्त्यांची डागडूजी केली. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान क्यक्त होत आहे.
येथील जुन्या पी. बी. रोडवरील डीसीसी बँकच्या समोर ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी चक्क नवीन काँक्रीटचा रस्ता खोदण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया क्यक्त झाल्या होत्या. नवीन रस्त्यात मधोमध खोदाई करण्यात आल्याने अवजड वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्त्यांचा विकास साधण्यात येत आहे. विविध ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र, याच नवीन काँक्रीटच्या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात येत असल्याने विकास केलेल्या रस्त्यांची दुर्दशा होताना दिसून येत आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यात आले. जुन्या पी. बी. रोडवर रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी झाकणाच्या सभोवती खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे नवीन काँक्रीटच्या चकचकीत रस्त्यांची दुर्दशा झाली होती. रस्ता मधोमध खोदल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. अवजड वाहनांना येथून जाणे मुश्कील बनले आहे. रात्रीच्या अंधारात केलेले खोदकाम दिसत नव्हते. त्यामुळे लहान सहान अपघात घडत होते. त्यामुळे खोदलेल्या जागेची डागडूजी तातडीने करावी, अशी मागणी होत होती. याची दखल घेत प्रशासनाने तातडीने डागडूजी केली आहे.