ऑनलाईन टीम / रायगड :
खोपोली तालुक्यातील आडगाव परिसरातील एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्कोस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जसनोव्हा कंपनीच्या केमिकल रिॲक्टरमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की दोन ते तीन किलोमीटरच्या परिसराला हादरे बसले. या हादऱ्याने शेजारच्या कंपन्यांचे छत कोसळून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहेत.
स्फोटात जसनोव्हा कंपनीबरोबरच एसएस पेपर ट्यूब, पेन ट्यूब या कंपन्यांचंही प्रचंड नुकसान झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आसपासच्या कंपन्यांतील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.