वार्ताहर /खोल
माटवेमळ, खोल येथे पंचायत कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर उतरणीवर दुचाकीला एका चारचाकी वाहनाने जबर धक्का देऊन घटनास्थळाहून पलायन करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सदर कार खोलमार्गे बेतूल येथे जात होती, तर दुचाकी नवी कोरी व आजच नोंदणी झालेली होती. या अपघातात दुचाकीची भरपूर हानी झाली असून चालकाचा पाय निकामी झाला आहे. स्थानिकांनी त्वरित 108 सेवेला फोन कॉल केला आणि अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर खासगी वाहनाने व नंतर 108 सेवेच्या वाहनाने जखमी चालकाला काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पलायन केलेल्या वाहनाला कुंकळ्ळी पोलिसांनी नंतर माग काढून पकडले.