वार्ताहर /खोल
सोलये, खोल येथील श्री बेताळ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज 17 रोजी होणार आहे. शिमगोत्सवाचे मांड ठेवल्यानंतर लगेच रात्रीपासून जत्रोत्सवाला सुरुवात होते. खोल पंचक्रोशीत एकाच दिवशी लहान-मोठय़ा बारा जत्रा होतात. त्यातील उणस, मलोरे, माटवे, वागोण, सोलये येथील जत्रा या प्रमुख जत्रा आहेत.
वेळीप समाजाच्या पाच मेळांचा संचार गेले चार दिवस संपूर्ण खोल गावात होता. पाचही मेळांचे पारंपरिक ठिकाणी मांड ठेवण्यात आले त्याचबरोबर सारस्वत समाजाच्या रोमट शिमगोत्सवाची सांगता श्री लक्ष्मीनारायण देवस्थानच्या प्रांगणात उत्साहात झाली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिमगोत्सवात तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांत मुक्त संचार करण्यास नागरिक धजावत नव्हते. मात्र आता परिस्थिती सुधारलेली असल्याने यंदा दुप्पट उत्साहाने आबालवृद्धांनी शिमगोत्सवात भाग घेतला.
मलोरेपासून एकेक जत्रा आटोपली जाऊन उणस, माटवे, वागोण व नंतर सोलये या ठिकाणी पारंपरिक घटकाची देवाची तरंगे, नवविवाहित व विवाहेच्छुक युवक रंगीत गुढय़ा व महिला डोक्मयावर दिवज घेऊन बरोबरीने जत्रोत्सवात पायी चालत येतात. सोलये, खोल येथील श्री बेताळाची जत्रा शिखर जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. श्रींचा अवतार, दिवजोत्सव, त्यानंतर तुळाभार तसेच पारंपरिक विधी यावेळी पार पाडले जातात. भक्तांच्या हाकेला व नवसाला पावणारा म्हणून बेतूबाब अर्थात श्री बेताळ प्रसिद्ध असून या जत्रोत्सवाला खोल गाव लोटतो. संपूर्ण गोव्यात या देवाचे भाविक विखुरलेले असून या प्रसिद्ध जत्रोत्सवात ते आवर्जुन सहभागी होताना दिसतात.