खोल – आगोंद रस्ता काही वेळ राहिला बंद, दुपारपर्यंत सारा अडथळा हटविला
वार्ताहर / खोल
खोल येथे साळेरी पुलानजीक रस्त्याच्या बाजूला दरड कोसळल्याने खोल-आगोंद रस्ता वाहतुकीसाठी काही वेळ बंद झाला. शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसानंतर ही घटना घडली. 90 अंशात डोंगर कापण्याच्या पद्धतीचा अवलंब करून सदर रस्त्याचे बांधकाम 1970 च्या दरम्यान करण्यात आले होते व खोल, आगोंद हे दोन्ही गाव जोडणाऱया साळेरी पुलाचा लोकार्पण सोहळा 23 फेब्रुवारी, 1974 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांच्या हस्ते झाला होता.
आजपर्यंत या मतदारसंघात माजी आमदार स्व. वासू पाईक गावकर, माजी मंत्री स्व. संजय बांदेकर, माजी आमदार विजय पै खोत, माजी मंत्री रमेश तवडकर व अन्य अनेक लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधीत्व केले, परंतु या समस्येकडे कोणी गंभीरपणे पाहिले नाही. पंचायत पातळीवरूनही कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. काणकोणमार्गे आगोंद पंचायतीच्या सीमेवरून खोल पंचायत क्षेत्रात प्रवेश करताना दोन्ही बाजूंनी जीव मुठीत धरून वाहनचालक तथा अन्य नागरिक या ठिकाणावरून ये-जा करत होते. सकाळच्या प्रहरी ही घटना घडली आणि आजुबाजूच्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना कोणतीही समस्या उद्भवली नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे
घटनेची माहिती मिळताच आगोंदचे पंच प्रमोद फळदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, अग्निशामक दल यांना तसेच उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना माहिती दिली. साबांखाचे साहाय्यक अभियंता स्वप्नील देसाई, कनिष्ट अभियंता राजेंद सावंत यांनी वेळ न दवडता घटनास्थळी जेसीबीसह भेट देऊन दुपारपर्यंत रस्त्यावरचा अडथळा दूर केला. सदर कोसळलेली दरड जरी दूर करण्यात आली असली, तरी डोंगराचा दुसरा कडा केव्हाही कोसळून पडण्याची शक्मयता नाकारता येत नसल्याचे व यासंदर्भात उपसभापतींना सूचित केले असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. काणकोण अग्निशामक दलानेही रस्ता मोकळा करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.