वृत्तसंस्था / मुंबई
ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांची वयाच्या 83 व्या वर्षी माहीमच्या सुखदा नर्सिंग होममध्ये प्राणज्योत मालवली. महाराष्ट्रातील उत्कृष्ट प्रशिक्षकापैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक उत्तम खो-खो संघटक हरपला, अशी प्रतिक्रिया माजी खेळाडूंनी दिली.
रमेश वरळीकर हे लहानपणापासूनच खो खो खेळाच्या प्रेमात पडलेले होते. प्रभाकर वरळीकर यांनी सुरू केलेल्या लोकसेना या खो-खो संघाचे ते एक यशस्वी प्रशिक्षक होते. शिवाजी पार्कच्या स्काऊट पॅव्हेलियनच्या समोर त्यावेळी त्यांचा खो-खोचा सराव चालायचा. त्याकाळी त्यांचा मुलींचा संघ अतिशय बलवान असा होता. त्यांनी घडवलेल्या नामवंत राष्ट्रीय खो-खो खेळाडूंमध्ये डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय तसेच बँक ऑफ इंडियाचे दिनेश परब हे सर्व त्यांनी घडवलेले खेळाडू होत. 1970 पर्यंत यांनी प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावली.
यादरम्यान रमेश वरळीकर हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते. त्याकाळी पंच म्हणून रमेश वरळीकर यांनी भरपूर काम केले होते. भाई नेरुरकर चषकात तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पंच म्हणून यशस्वी कामगिरी वरळीकर सरांनी सांभाळली होती. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. या सर्व प्रवासात वरळीकर सर स्पर्धेदरम्यान स्पर्धेची व खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची नोंद ठेवत असत. 1970 पासून त्यांनी खऱया अर्थाने सांख्यिकीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी खो-खोच्या नोंदणीचे पुस्तक छापले. त्यांनी सांख्यिकीचे पुस्तक छापले तसेच खो-खो खेळाबद्दल सविस्तर पुस्तके सुध्दा आणली. अशाप्रकारे त्यांनी छोटी-मोठी चौदा पुस्तके लिहिलेली आहेत. खो-खो चा इतिहास सांगताना त्यांनी मांडलेले अभ्यासपूर्ण मत आजही प्रमाण मानले जाते.
रमेश वरळीकर म्हणजे खो-खोचा एक चालताबोलता इतिहासच होता. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले की त्या-त्या प्रसंगी अभ्यासपूर्ण नोंदी समोरील खोखो प्रेमींसमोर समोर अलगद उलगडायचे. अनेक पंच वर्गांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले होते. अमरहिंद मंडळाचे ते माजी विश्वस्त. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे ते सुरुवातीला काही काळ पदाधिकारी होते. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मधून निवृत्तीनंतर त्यांनी खोखोची निस्सीम सेवा केली होती.
2010 साली वियोम फाऊंडेशनतर्फे जेव्हा मुंबईत शिवाजी पार्कवर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा (मुंबईतील एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धा) आयोजित केली होती त्यावेळी मुंबईत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पाहण्याचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून संगितले होते. मुंबई खो-खो संघटनेतर्फे दिला जाणारा एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता खो-खो पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते व हा पुरस्कार त्यांना 2010 साली त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेने दिला होता.