वृत्तसंस्था / ख्राइस्टचर्च :
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात मागील वर्षी 15 मार्च रोजी दोन मशिदींमध्ये गोळीबार करणाऱया ऑस्ट्रेलियन नागरिकाला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. गुन्हेगाराला संचित रजाही नाकारण्यात आली आहे. मशिदींमध्ये शिरून केलेल्या गोळीबारात 51 लोक मारले गेले होते तर 40 जण जखमी झाले होते.
हल्लेखोर आमच्या देशात केवळ नृशंस हत्यासत्राच्या उद्देशानेच आला होता. आमच्या देशाला माणुसकीसाठी ओळखले जाते, असे न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावताना म्हटले आहे.
गुन्हेगार ब्रेंटन याला एकूण 82 प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रत्येक हत्या आणि त्याच्या प्रयत्नासाठी ही शिक्षा झाली आहे. एखाद्या गुन्हेगाराला पॅरोलरहित जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची न्यूझीलंडच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी शिक्षेच्या घोषणेवेळी हल्ल्यातील पीडित कुटुंबे उपस्थित होती. या प्रकरणाची सुनावणी एक वर्षात पूर्ण झाली होती. मार्च महिन्यात ब्रेंटनला दोषी ठरविण्यात आले होते.