खारवी, भंडारी उमेदवार वगळता अन्य कुणाला अद्याप स्थान नाही
गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
बार्देश तालुक्यातील महत्त्वाचा किनारपट्टी परिसरातील मतदारसंघ म्हणजे शिवोली. या मतदारसंघात भंडारी समाज बांधव मोठय़ा प्रमाणात असून यामध्ये एकाचवेळी खारवी वगळता आजवर फक्त भंडारी समाजातील आमदाराने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. भाजपने शिवोलीत ख्रिश्चन समाजाच्या उमेदवारास प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली नसली तरी कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी आपली पत्नी तथा पर्राच्या सरपंच डिलायला लोबो यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी विविध सरपंच, पंच सदस्यांसोबत बैठकाही झाल्या आहेत. दुसऱया बाजूने विद्यमान आमदार विनोद पालयेकर यांनी आपण सलग दुसऱयांदा गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर पुन्हा निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट केले आहे तर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी पक्षश्रेष्ठीr भाजपची तिकीट आपल्यास देतील, असे दावा करून प्रचारकार्य हळूहळू सुरू केले आहे. काँग्रेसतर्फे समाजसेवक दत्ताराम पेडणेकर हे तिकिटाचे दावेदार असून त्यांनीही येथे प्रचार कार्य जोरात सुरू केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट असून यात कोण बाजी मारतो याकडे शिवोलीवासियांचे लक्ष लागणार आहे. त्यात विशेष म्हणजे भंडारी समाजाचे लोक आता आगामी निवडणुकीत ख्रिश्चन समाजाला संधी देणार काय? हेही तितकेच महत्त्वाचे असून तसे झाल्यास या मतदारसंघात एक नवीन इतिहास घडू शकतो, हेही खरे आहे. मंत्री मायकल लोबो शिवोलीत हा बदल घडवून आणण्यास यशस्वी होतील काय? हे आगामी निवडणुकीतच दिसून येणार आहे.
मंत्री लोबोंच्या भूमिकेने शिवोलीत राजकारणाला वेगळा रंग
बार्देश तालुक्यातील अन्य एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिवोली मतदारसंघ. या मतदारसंघात आजवर खारवी समाज किंवा भंडारी समाजाच्याच प्रतिनिधीने येथे आमदार म्हणून काम पाहिले आहे. माजी मंत्री ऍड. चंद्रकांत चोडणकर वगळता या मतदारसंघात फक्त भंडारी समाजाच्याच आमदाराने प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा कार्यकाळ सर्वाधिक ठरला आहे. असे असले तरी आता कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी आपले पाऊल शिवोली मतदारसंघात टाकल्याने राजकारणाला आता वेगळा रंग आला आहे. मंत्री मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून मंत्री लोबो व पर्राच्या सरपंच डिलायला लोबो यांनी शिवोली मतदारसंघात सरपंचांसोबत प्रत्येक पंचायत क्षेत्रात आपल्या बैठका घेऊन भावी वाटचालीबाबत माहिती सरपंच, पंचाना दिली आहे.
भंडारी, खारवी उमेदवारांनाच संधी
नेमक्या कोणत्या पक्षाबरोबर निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सध्या अपक्ष म्हणूनच प्रचारकार्यास सुरुवात झालेली आहे. मायकल लोबोंची एन्ट्री शिवोलीत नवीन इतिहास घडवेल काय, हे आगामी काळात दिसून येणारच आहे. कारण विशेष म्हणजे शिवोली मतदारसंघात ‘कार’ ते मग चोडणकार, मांद्रेकार वा पालयेकार असो यांच्या शिवाय अन्य कुणी अद्याप तरी निवडून आलेले नाही. खारवी समाजाचे ऍड. चंद्रकांत चोडणकर त्यावेळी निवडून येण्यामागे कारण म्हणजे किनारी भाग खारवी समाजाने व्यापला होता. त्यात कामुर्ली, कोलवाळ भाग त्यावेळी शिवोली मतदारसंघाला जोडला होताः मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. हा किनारी भाग थिवी मतदारसंघात घालण्यात आलेला आहे. या मतदारसंघात काँग्रेसतर्फे यापूर्वी ख्रिश्चन उमेदवार म्हणून वेर्ला काणका पंचायतीचे सरपंच दिवंगत कै. मिल्टन मार्कीस यांनी दोनवेळा उमेदवारी मिळविली. मात्र ख्रिश्चन समाजाचा म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले नाही, असा इतिहास आहे. डिलायला लोबो शिवोली मतदारसंघातून विजयी झाल्यास शिवोली मतदारसंघात एक इतिहास घडू शकतो. मायकल लोबो आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघात कोणत्या पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात ठेवणार, याकडे सर्वच पक्षश्रेष्ठी व तमाम शिवोलीवासियांना उत्सुकता लागून राहिली आहेत.
लोबोंच्या चालीकडे शिवोलीवासियांचे लक्ष
महिन्यापूर्वीच मंत्री मायकल लोबो यांनी आपली पत्नी डिलायला लोबो साळगाव वा शिवोली मतदारसंघातून तिकिटसाठी दावा करणार, असल्याचे स्पष्ट केले होते. त्या कोणत्या पक्षावर निवडणूक लढविणार, असे पत्रकारांनी विचारले असता त्या भाजपच्या उपाध्यक्षा असून कै. मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी त्यांना तिकीट देण्याचे साळगावातून आश्वासन दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांना मागेही काढले होते असे ते म्हणाले. आता मात्र चित्र वेगळे असून त्या या दोन्ही मतदारसंघात तिकिटासाठी दावा करणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले आहे. आगामी निवडणुकीत शिवोलीतील राजकीय खेळात मंत्री लोबो आपली वेगळी चाल कशाप्रकारे खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
पंचायतीवर लोबोचे वर्चस्व
मंत्री मायकल लोबो यांनी वेर्ला काणका पंचायत, आसगाव पंचायत, हणजूण पंचायत व शिवोली मार्ना पंचायतीच्या सर्व पंचायत मंडळाबरोबर बैठका घेऊन येत्या निवडणुकीत आपली पत्नी डिलायला लोबो निवडणूक लढवित असल्याचे सांगून त्यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय त्यांची सर्व कामे करण्याचे आश्वासनही दिलेले आहे. या मतदारसंघात सहा पंचायती असून चार पंचायतीवर लोबो यांनी आपले वर्चस्व दाखविले आहे. त्यामुळे यंदा येथील राजकारण कोणत्या दिशेला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.
भाजपतर्फे दयानंद मांद्रेकरांच्या नावाला पसंती
सध्या भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवोली मतदारसंघातून भाजपची तिकीट जवळ जवळ माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना निश्चित झाली असून त्यांना तुम्ही आतापासूनच प्रचाराला लागा, असे सांगितल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांचे चिरंजीव तथा युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्या नावाची शिफारस होती. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी त्यांचे वडील दयानंद यांच्याच नावाला अधिक पसंती दिल्याने त्यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त आहे. उत्तर गोवा भाजप कार्यकारिणी सदस्यांच्या खास बैठकीत महामंत्री व मुख्यमंत्र्यांनी दयानंद मांद्रेकरांचे नाव भावी उमेदवार म्हणून घोषित केल्याचे वृत्त असून त्यामुळे भाजपची तिकीट दयानंद मांद्रेकर यांच्याच गळय़ात पडेले, हे निश्चित आहे.
मागील निवडणुकीत शिवोली विधानसभा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर विरुद्ध भाजपचे दयानंद मांद्रेकर अशी अटीतटीची लढत झाली होती. आगामी निवडणुकीत मंत्री लोबोंच्या पत्नीमुळे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. 2022मध्ये होणाऱया निवडणुकीत शिवोली मतदारसंघातून यावेळी अनेकजण इच्छुक असल्याचे सध्या दिसत आहे. मागच्यावेळी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले पण ऐनवेळी माघार घेतलेले नीलेश वेर्णेकर यावेळी निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा पर्यायही त्यांच्याकडे आहे. शिवोली स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडेही मोठा जनसंपर्क आहे. त्यांनीही काँग्रेसची तिकीट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविला असला तरी ते मंत्री लोबोंच्या संपर्कात आहेत, असे वृत्त आहे. शिवाय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर यांचे चिरंजीव रोशन चोडणकर हेही या स्पर्धेत आहेत. 2017 च्या निवडणुकीत रोशन यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. ऐनवेळी पक्षाचा एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. दत्ताराम पेडणेकर यांनी सध्या शिवोली मतदारसंघात जाळे विणले आहे. या गावासाठी रुग्णवाहिका, हर्सवेन शिवाय शेतकरी वर्गांना घरोघरी खत, भात तसेच नांगरणी पेरणी व भातकापणीसाठी स्वखर्चाने देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांचा संपर्कही घरोघरी आहे. त्या दृष्टीने ते कामास लागले आहेत. पक्षश्रेष्ठींनीही त्यांना प्राचाराच्या कामास लागा, असे सांगितले आहे. काँग्रेसतर्फे सध्यातरी बार्देशात श्री. पेडणेकर हे एकमेव उमेदवार प्रचार करीत असल्याचे दिसून येते. लिओ डायसही तिकीटासाठी प्रयत्नशील आहेत. चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे मागील निवडणूक आरामात जिंकणार असा आत्मविश्वासात होता. मात्र ते त्यांना शक्य झाले नाही. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत शिवोली भाजपचा विजय झालेला होता. या विजयामागे मांद्रेकर यांचे योगदान असल्याचे मानले जाते. त्यामुळे शिवोली भाजप मंडळाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. यंदा भाजपच्या तिकिटाची दावेदारी भाजप महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य पल्लवी दाभोलकर यांनीही केली आहे.
गोवा फॉरवर्डतर्फे विनोद पालयेकर
सध्या या मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर आमदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दयानंद मांद्रेकर विरुद्ध पालयेकर कुटुंबामध्ये जोरदार लढत होत असून आताही तेच चित्र आम्हाला पहायला मिळणार आहे. पालयेकर घराण्यातील उदय पालयेकर यांचे राजकीय योगदान मोठे आहे. विनोद पालयेकर यांचे ते आधारस्तंभ होते; मात्र अलीकडेच त्यांचे अकाली निधन झाल्याने त्यांची कमतरता विनोद पालयेकर यांना बरीच भासेल. त्यांच्या निधनाने राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. विनोद पालयेकर यांनी शिवोलीत आपण विकास केल्याचा सांगितले असून त्या विकासाच्या आधारे आपण सलग दुसऱयांदा निवडून येईल, असे पत्रकारांशी बलोताना स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात पाण्याची पाईपलाईन आणण्यास आपले मोलाचे योगदान असल्याचे ते म्हणाले. हा मतदारसंघ पूर्वी विकसित नव्हता. तेथे सौंदर्यीकरण करण्यास आपण महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे पालयेकर यांचे म्हणणे आहे. पाईपलाईनमुळे शिवोलीतील रस्त्याचे काम राहून गेले पुन्हा पुन्हा खोदकाम नको यामुळे यावर कायमचा तोडगा काढला जाईल व सर्व रस्ते हॉटमिक्स करण्यात येतील, असे पालयेकर यांचे म्हणणे आहे. आपल्या कार्याची पोचपावती शिवोलीवासीय आपल्यास देतील, असा दावा ते करत आहेत.