नागपूर/प्रतिनिधी
गुंड अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गुन्हेगारीच्या दुनियेत अरुण गवळी नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा अरुण गवळी महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. कारागृह अधीक्षक अनूप कुमरे यांनी सांगितले की, गवळी याने नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (वायसीएमओयू) २०१९ मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती.
गवळीने नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असून गवळी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात प्रत्येकी एका विषयात नापास झाला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला ATKT तरतुदीअंतर्गत अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात प्रवेश मिळाला आहे.
अन्य एका अधिकाऱ्याने आलेल्या माहितीनुसार, गवळीसह नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एकूण २२९ कैदी सध्या बीए ते मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पर्यंत विविध शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १४७ महिलांसह १५७ कैदी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए करत होते, तर दोन महिलांसह ७२ कैद्यांनी इग्नूमध्ये नोंदणी केली होती.