58 टक्क्यांच्या हिस्सेदारीचा 3604 कोटींना व्यवहार होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानी समूहातील कंपनी अदानी पोर्ट्स ऍण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन गंगावरम पोर्ट लिमिटेडची जवळपास 58.1 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचे संकेत आहेत. सदरचा व्यवहार हा 3604 कोटी रुपयांमध्ये होणार असल्याची माहिती आहे. अदानी पोर्ट डीव्हीएस राजू ऍण्ड फॅमिलीमधून ही हिस्सेदारी खरेदी करणार असल्याची माहिती आहे.
अदानी पोर्टस यांनी 3 मार्च रोजी गंगावरम पोर्टमधील वॉरबर्ग पिन्कसची 31.5 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदीची घोषणा केली होती. आता नवीन खरेदीसोबत अदानीची गंगावरम पोर्टमधील हिस्सेदारी ही 89.6 टक्के होणार आहे.
गंगावरम पोर्ट उत्तर आंध्र प्रदेशमधील व्हिजाग बंदराजवळ आहे. हे सध्याच्या घडीला आंध्रप्रदेशमधील दुसरे सर्वात मोठे बंदर आहे. या बंदराची क्षमता ही 64 दशलक्ष मेट्रीक टन आहे. हे एक उत्तम, सर्व हवामानाला तोंड देणारं बहुपर्यायी बंदर आहे. याची स्थापना ही आंध्रप्रदेश सरकारसोबत मिळून करण्यात आली होती.
8 राज्यांचे प्रवेशद्वार गंगावरम
गंगावरम पोर्टवर विविध वस्तूंची मागणी केली जाते. यामध्ये कोळसा, लोहखनिज, खते, चुनखडी, बॉक्साइट, साखर, ऍल्यूमिनियम आणि स्टीलचा समावेश आहे. सदरचे बंदर हे पूर्व, दक्षिण, दक्षिण पूर्व आणि मध्य भारतामध्ये 8 राज्यांमध्ये महत्त्वाचे प्रवेशाचे बंदर आहे. याच्या अधिग्रहणाच्या मदतीने अदानी पोर्टस देशभरात आपली ओळख निर्माण करण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये 1082 कोटीचा महसूल
गंगावरम पोर्टचा मागच्या वर्षी एकूण महसूल 1082 कोटी रुपयांवर राहिल्याची माहिती आहे. तसेच गंगावरम बंदर हे कर्जमुक्त असल्याची माहिती आहे.