नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. देशातील 12 ते 17 वयोगटातील मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून कोरोना लस मिळणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या 12 कोटींपर्यंत आहे. ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱया मुलांना दिली जाईल. ‘डीसीजीआय’कडून यासाठीची परवानगी मिळाली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून मुलांना झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ ही लस दिली जाऊ शकते.
भारतात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुले आहेत. यापैकी 1 टक्क्मयांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात असा अंदाज आहे. सर्वप्रथम 12 ते 17 वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना लस दिली जाईल. येत्या काळात आयोजित करण्यात येणाऱया राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या बैठकीत गंभीर आजारांच्या श्रेणीमध्ये कोणत्या रोगांचा समावेश करायचा? याबाबत निर्णय घेऊन यादी जाहीर केली जाईल. तर याच वयोगटातील निरोगी मुलांना मार्च 2022 पर्यंत लसीकरणासाठी थांबावे लागणार आहे. झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाऊ शकते. तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांनाही देता येईल. झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला ‘झायकोव्ह-डी’ असे नाव देण्यात आले आहे. ही डीएनएवर आधारित जगातील पहिली स्वदेशी लस आहे. सरकारच्या तज्ञ समितीच्या शिफारशीनंतर डीसीजीआयने झायडस कॅडिलानिर्मित ‘झायकोव्ह-डी’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापरासाठी आपत्कालीन मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी लस आहे.