कर्करोग, किडनी अन् हृदयविकाराने ग्रस्त 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना प्राधान्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकार आजारांनी पीडित 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांचे लसीकरण लवकर सुरू करू शकते. पण, पूर्णपणे तंदुरुस्त मुलांना सध्या याचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. कोरोना लसीकरणावर सरकारला सल्ला देणाऱया समितीनुसार देशात सद्यकाळात 40 कोटी मुले आहेत. सर्वांचे लसीकरण सुरू केल्यास पूर्वीपासून सुरू असलेल्या प्रौढांच्या लसीकरणावर प्रभाव पडू शकतो.
प्रथम प्रौढांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, अन्यथा आगामी काळात देशात महामारीची तीव्रता वाढू शकते. सध्या 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या मुलांना लस देण्यात यावी. प्रत्येक मुलाला शाळेत पाठविण्यापूर्वी त्याच्या लसीकरणाची गरज नसल्याचे समितीचे मानणे आहे.
सुदृढ मुले प्रतीक्षेत
पूर्णपणे सुदृढ मुलांना लसीकरणासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्यकाळात सर्व मुलांचे लसीकरण सुरू केल्यास सध्या चाललेल्या लसीकरण मोहिमेला फटका बसेल. तसेच युवांसोबत वृद्धांना लसीचे डोस न मिळाल्यास रुग्णालयातील संक्रमितांची संख्या वाढू लागेल, असे उद्गार समितीचे अध्यक्ष एन .के. अरोरा यांनी काढले आहेत.
कुठल्या मुलांना प्राधान्य
समितीच्या सल्ल्यानुसार गंभीर आजार असलेल्या मुलांचे प्रथम लसीकरण केले जाईल. किडनी प्रत्यारोपण, जन्मापासून कर्करोगाने ग्रस्त किंवा हृदयविकार असलेल्या मुलांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे.
तीन कंपन्यांकडून परीक्षण
भारतात अद्याप मुलांसाठीच्या कुठल्याच लसीला मान्यता देण्यात आलेली आही. कोव्हॅक्सिनचे मुलांवर वैद्यकीय परीक्षण सुरू आहे. जायडस कॅडिलाच्या डीएनए आधारित लसीचे 12-17 वयोगटातील परीक्षण पार पडले आहे. कंपनीने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज देखील केला आहे. याचबरोबर पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया देखील 2-12 वयोगटातील मुलांवर कोवाव्हॅक्स लसीचे दुसऱया तसेच तिसऱया टप्प्यातील परीक्षण करत आहे.