फलटण पोलिसांची कारवाई – अकरा वर्षापासून होता फरार
प्रतिनिधी/ फलटण
खून, बलत्कार व अन्य गंभीर गुह्यात अकरा वर्षापासून फरारी असणाऱया एका आरोपीस शहर पोलिसांच्या पथकाने निमगाव केतकी येथून ताब्यात घेवून अटक केली असून केनशा भगवान काळे असे त्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 जुलै 2010 रोजी सोनवडी बुद्रुक (ता.फलटण) येथे राणी रवींद्र काळे (राहणार सोनवाडी बुद्रुक ता.फलटण) या महिलेचा अनैतिक संबंध व पैशाचे कारणावरून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या खुनाच्या गुह्यातील आरोपी केनशा भगवान काळे हा घटना घडल्यापासून तब्बल 11 वर्षांपासून फरार होता. या गुह्याचा तपास करून पाच आरोपी पैकी चार आरोपी विरुद्ध मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. एक आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर गुह्यातील तीन आरोपींचा निकाल लागला असून दोन आरोपींचा निकाल राखून ठेवला आहे.
दरम्यान पोलीस नाईक चतुरे यांना बातमीदारामार्फत गुह्यातील फरार आरोपी केनशा भगवान काळे हा निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील एका हॉटेलवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. नंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर, पोलीस नाईक चतुरे, पोलीस शिपाई मेगावडे, पोलीस शिपाई सांडगे, पोलीस शिपाई जगताप आदी पोलीस कर्मचाऱयांचे पथक तयार केले. या पथकातील पोलीस कर्मचाऱयांनी या आरोपीस मोठय़ा शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
सदर आरोपी विरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून सदर गुह्यात आरोपी फरारी होता. याशिवाय त्याच्याकडून फलटण शहरातील व आसपासचे भागातील घरफोडी सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहोत.