प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यात आज दिवसभरात 12 कोरोनाबाधित आढळून आले. तालूक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 28 वर पोहोचली आहे. गगनबावडा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने जनतेतून चिंता व्यक्त होत आहे.
गारीवडे येथील आरोग्य सहाय्यिका पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या गारीवडे, बावेली, खेरीवडे, शेळोशी, धुंदवडे येथील सात जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून धुंदवडे येथे दोन, शेळोशी येथे दोन, खेरीवडे एक, गारीवडे एक व बावेली येथील एक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तळये येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर निवडे येथे दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गगनबावडा येथील एक आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीस असून तेथील आरोग्य सेविकेच्या तो संपर्कात आला होता. आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
गगनबावडा तालुक्यात सोमवारपासून वीज व दूरध्वनी सेवा कोलमडली आहे. त्याचा फटका कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणा-या व क्वारंटाईन केलेल्या लोकांना बसला असून मेणबत्तीच्या प्रकाशात उपचार व रात्र काढावी लागत आहे. एकूणच तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने जनतेतून चिंता व्यक्त होत आहे.