परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी प्रशासकीय मंजूरी मिळाल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.गगनबावडा एस.टी.डेपोमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून या बसस्थानकाच्या विकासकामाला गती मिळणार आहे. बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, डेपो परिसर व बसस्थानकासमोरील कॉंक्रिटीकरण, इमारतीची डागडुजी, पार्किंग व्यवस्था, अंतर्गत सोयीसुविधा, प्रसाधनगृह, हाय मास्ट दिवे, आदिसह सर्व सुविधांनीयुक्त परिसराचे सुशोभिकरण या निधीतून होणार आहे.
निधी मंजूरीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचे सहकार्य केल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगीतले.
एस.टी.प्रवाशांना होणार लाभ
तळकोकण, गोवा व पश्र्चिम महाराष्ट्र दरम्यान गगनबावडा हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. एस.टी.प्रवाशांची रात्रंदिन येथे गर्दी असते. सुविधांची वाणवा असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असे. या बसस्थानकाचे नुतनीकरण होणार असल्याने याचा प्रवासी वर्गास लाभ होणार आहे.