प्रतिनिधी / गगनबावडा :
सलग चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे गगनबावडा परिसरात मान्सून सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर तळकोकणातून येणाऱ्या सुसाट वाऱ्यासोबत धुक्याची झालर आल्याने गगनबावडा धुक्यात हरवल्याचा भास होत आहे.
गगनबावडा म्हणजे पावसाचे आगर होय. गेल्या आठवड्यापासून गगनबावडा तालुक्यात मान्सून सक्रिय झाला आहे. चार दिवसांपासून तर पावसाचा जोर आणखी वाढला असल्याने तालुका ठिकाणचा सभोवतालचा भाग जलमय झाला आहे. तर तळकोकणात उतरणाऱ्या करुळ व भूईबावडा या दोन्ही घाटमार्गातील धबधबे कोसळू लागले आहेत. मे अखेरीस झालेल्या वळीव पावसाने डोंगररांगा हिरवाईने नटलेल्या आहेत. तळकोकणातून येणाऱ्या धुक्याच्या लहरी घाटमाथ्यावर सर्वत्र पसरताना दिसून येत आहेत.
गगनबावडा मुख्य शहर, एस.टी.स्टॅंड, एम.एस.सी.बी, एम.टी.डी.सी., पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी घनदाट धुके पसरले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. त्यामूळे वाहनेही दुर्मिळ आहेत. येथे रात्रंदिन धुके पसरले आहे. त्यामूळे हा संपूर्ण परिसर धुक्यात हरवल़्याचा भास होत आहे. येथे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत सर्वत्र धुके पसरले आहे.