फोंडा/
राज्यात पुढील तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’लागू करण्यात आल्याने काल गुरुवारी फोंडा बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली. विशेष म्हणजे येत्या सोमवारी गटारी अमावस्या असल्याने व त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने चिकन व मासे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
अमावस्या सोमवारी आल्याने गटारीची पार्टी रविवारीच करण्याचा लोकांचा बेत आहे. त्यामुळे आजपासून पुढील तीन दिवस लॉकडाऊन असल्याने मासे व चिकन खवय्यानी गुरुवारच्या दिवशीच गटारीची खरेदी करुन ठेवले आहे. गोव्यात बरेच लोक श्रावण महिन्यात शाकाहर पाळत असल्याने गटारी अमावस्येला मासे व चिकनच्या पार्टीचा बेत आखतात. त्यानंतर महिनाभर शाकाहर पाळून गणेश चतुर्थीला घरच्या गणपतीचे विसर्जन करुनच माशांच्या जेवणावर ताव मारतात. त्यामुळे गटारी अमावस्येला मासे व चिकनला मोठी मागणी असते. तीन दिवसांचे लॉकडाऊन गटारीच्या आड आल्याने मत्स्य व चिकन खवय्यांनी काल गुरुवारीच खरेदी केली आहे. ऐरवी गुरुवारच्या दिवशी फोंडय़ातील मासळी व चिकन बाजारात फारसे ग्राहक फिरकत नाहीत. पण कालच्या दिवशी गटारी अमावस्येच्या पूर्व खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली होती. काही चिकन स्टाल्सवर दुपारनंतर चिकन संपत आले होते. गेल्या काही वर्षांमध्ये नववर्षांच्या पूर्वसंध्येला जशा पाटर्य़ा रंगातत, तसेच स्वरुप गटारी अमावस्येला आले आहे. एरवी बार रेस्टोरंट किंवा फार्म हाऊसमध्ये रंगणाऱया गटारीच्या पाटर्य़ांना यंदा लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला तरी, या पाटर्य़ा कुटुंबियांसोबत किंवा मित्रपरिवारासह घरच्या घरीच रंगणार आहे.