सावगावमध्ये घरगुती नळासाठी जेडलेल्या जलवाहिन्या दुरुस्ती करण्यास टाळाटाळ : कंत्राटदारावर कारवाईची मागणी
वार्ताहर /हिंडलगा
सावगावमध्ये सुरू असलेल्या गटार बांधकामामुळे गावामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक व घरगुती जलवाहिन्या फुटून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीदेखील संबंधित कंत्राटदार दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रा. पं. सदस्यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना शनिवारी निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत व सावगाव व मंडोळी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या सावगावमधून रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून यासाठी गावामध्ये ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. गटारी खोदण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आल्याने गावातील सार्वजनिक व घरगुती पाण्यासाठी जोडण्यात आलेल्या नळांच्या जलवाहिन्या मोठय़ा प्रमाणात तुटल्या आहेत. परिणामी बेनकनहळ्ळी ग्रा. पं. व ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला संबंधित कंत्राटदाराने झालेल्या नुकसानीची आपणच भरपाई करून देणार असल्याचे सांगितले होते. पण आता मात्र जलवाहिनी दुरुस्त करून देण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत आहे. तर ग्रा. पं. चेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पण पाणी पुरवठा होणाऱया मुख्य जलवाहिन्या फुटल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित झालेल्या नुकसानीची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तसेच संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.