प्रतिनिधी / गडहिंग्लज
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. असे असताना येथील संकेश्वर रोडवरील जुम्मा मशिदीत सामुहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. यातील काहीजण पळून गेल्याचा संशय व्यक्त होतो आहे. पोलीसांनी ७ जणांच्यावर कारवाई केली आहे.
रात्री उशिरापर्यंत यांच्यावर गुन्हा नोंदवला जात होता. संचारबंदी असल्यामुळे मशिदीला समोरच्या पासून कुलूप होते. त्यामुळे हे सर्वजण मशिदीच्या मागील दाराने मशिदीत गेल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. मशिदित नमाज पठणासाठी आलेल्यांवर कारवाई केल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे.