●ऑन लाईन प्रवेश झाले हाऊस फुल्ल
●शहरातील शाळापेक्षा गावातील शाळाना मोठी मागणी
●गावच्या शाळांचे पट वाढले
●शाळा सुरू होईल तेव्हा बसायला विद्यार्थ्यांना वर्गात पुरणार नाही जागा
●कोरोनाच्या कहराने गावाकडे लोंढे वाढले
विशाल कदम/सातारा
जिल्ह्यातील 1732 गावांपैकी अनेक गावांत केवळ वयोवृद्ध व्यक्ती असायच्या. बाकीच्या पोटापाण्यासाठी पुण्यमुंबईत असायचे. महात्मा गांधीजीनी खेड्याकडे चला हा संदेश दिला होता. त्याच्या उलटंच चित्र गेल्या दहा वर्षात तयार झाले होते. पटसंख्येअभावी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याची अवस्था झाली होती. यावर्षी उलट चित्र असून कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्यामुंबईतले चाकरमानी गावात तळ ठोकून आहेत. त्यांनी आपल्या मुलांना गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑन लाईन प्रवेश मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात 6 हजार 477 नवीन प्रवेश झाले आहेत. दुसर्या शाळेतून 520 प्रवेश तर एकूण 6 हजार 997 प्रवेश झाले आहेत. पहिलीसाठी 6 हजार 244 प्रवेश तर इतर वर्गाचे 753 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे गड्या आपल्या गावची झेडपीची शाळा बरी असाच सूर आता दिसू लागला आहे.
गेली अनेक वर्षांपासून खेडी भकास आणि शहरे हाऊसफुल्ल झाली होती. गावाकडे वयोवृद्ध फक्त आणि तरुण सगळे पुण्यामुंबईत दिसायचे. या चित्रांमुळे राज्य शासनाने ही गावाकडे कमी पट असलेल्या शाळा ही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यातल्या काही कमी पटाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे जगावर संकट कोसळले आणि त्या संकटात शहरे लॉक डाऊन झाली. एक महिना, दोन महिने, तीन महिने झाले तरी कोरोनाचा कहर कमी होत नाही. काही चाकरमानी लॉक डाऊनच्या सुरुवातीलाच गावाकडे सापडेल त्या वाहनाने आले. गावात राहू लागली. गावात चाकरमानी आल्याने गावात गर्दी दिसू लागली. कोरोनाच संकट शहरकडून गावाकडे आलं असलं तरी गाव ते गावच. त्यात आपल्या मुलांना आता गावच्या शाळेतच घालायचे येथेच शिकवायचे म्हणून ऑनलाइन प्रवेश घेतले. आता जिल्हा परिषदे शाळाची प्रवेश नोंदणी हाऊसफुल झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत दर्जेदार शिक्षण दिले जाते.ग्रामीण भागातील शाळांमध्ये भौतिक सुविधा दिल्या जातात.काही शाळा सौर शाळा आहेत.शाळांमध्ये विद्यार्थाकरता जिम आहे.संगणक शिक्षण दिले जाते. प्रभावती कोळेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी
आॅनलाईन प्रवेशअर्ज भरलेले विद्यार्थी
पाटण 1961
कराड 1649
वाई 877
खटाव 562
सातारा 492
जावली 424
महाबळेश्वर 420
कोरेगाव 274
फलटण 181
माण 119
खंडाळा 37
एकूण 6997
तालुका निहाय पट संख्या
तालुका मुले मुली एकूण
जावली 752 -786 – 1538
कराड 3721 – 3395 – 7116
कोरेगाव 1906 – 1862 – 3768
खटाव 2508 – 2212 – 4720
खंडाळा 1550 – 1403 – 2953
महाबळेश्वर 375 – 382 – 757
माण 1651 – 1493 – 3144
पाटण 2197 – 2216 – 4413
फलटण 2633- 2488- 5121
सातारा 2266 – 2186 – 4452
वाई 1755 – 1738 – 3493