विविध राज्यांचे चित्ररथ ठरणार आकर्षण, कार्यक्रम आटोपशीर होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या 72 व्या गणतंत्रदिन कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रतिवर्षाच्या प्रथेप्रमाणे राजपथावर तिन्ही सेना दलांचे शानदार संचलन होणार असून त्यात भारताच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शनही कोटय़वधी भारतीयांना होणार आहे. यासमवेतच विविध राज्यांचे चित्ररथ समारंभाची शोभा वाढविणार आहेत. तथापि, यंदाच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे समारंभाचे स्वरूप आटोपशीर ठेवण्यात आले असून मोटारसायकलींच्या चित्तथरारक कसरतींना फाटा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी कोणताही विदेशी राष्ट्रप्रमुख प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केला गेलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संचलनाच्या निमित्ताने राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमावर दरवर्षीप्रमाणे आकाशातून देखरेख ठेवण्यासाठी विशेष हेलिकॉप्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱया नागरीकांची कसून तपासणी केली जात असून यंदा प्रेक्षकांची संख्याही मर्यादित ठेवण्यात आली आहे.
रॉकिंग रिओ ठरणार आकर्षण
61 घोडदळ तुकडीचा रॉकिंग रिओ हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. या तुकडीचा यंदा हा सलग अठरावा सहभाग आहे. रिओ हा या कार्यक्रमातील एक अश्व असून तो सध्या 22 वर्षांचा आहे. हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांना आवडतो असा अनुभव आहे. रिओ हा अत्यंत बुद्धीमान अश्व असून तो त्याला दिलेल्या शाब्दिक आज्ञा ओळखू शकतो आणि त्यानुसार कृती करतो, अशी त्याची माहिती या तुकडीच्या प्रमुखांकडून देण्यात आली. रिओचे उत्तरदायित्व कॅप्टन शिवरन यांच्याकडे आहे. या तुकडीने जोरदार सराव केला आहे.