वैभव पवार/ गणपतीपुळे
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवासामध्ये कोकणातील पहिलाच उपक्रम म्हणून प्रदूषणमुक्त दोन बॅटरी कार आणण्यात आल्या आहेत. एमटीडीसीने या कार स्वरकमेतून आणल्या असून त्यांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.
गुरुवारी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे विविध कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः ही कार चालवण्याचा आनंद घेतला. एमटीडीसीच्या पाच रिसॉर्टपैकी गणपतीपुळे येथे ही कार सर्वप्रथम दिल्याबद्दल एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांचे त्यांनी कौतुक केले. त्यामुळे येथील पर्यटकांना गणपतीपुळे एमटीडीसी परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे. मुख्य एमटीडीसी पर्यटन निवासापासून 1 किलोमिटरवरील तंबू निवास मार्गावरही या कारचा वापर शक्य होणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून कोकणात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. शासनाने कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याने सध्या पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. या पर्यटकांना नाविन्यपूर्ण सोयीसुविधांनी आकर्षित करण्याच्या हेतूने गणपतीपुळे एमटीडीसीने बॅटरी कारचा उपक्रम राबवला आहे.
गणपतीपुळे रिसॉर्टला मोठी पसंती
एमटीडीसीचे कोकणामध्ये हरिहरेश्वर, कुणकेश्वर, वेळणेश्वर, तारकर्ली, गणपतीपुळे असे पर्यटन निवास आहेत. यामध्ये गणपतीपुळे हे सर्वात मोठय़ा आर्थिक उलाढाल व जास्त उत्पन्नाचे पर्यटन निवास म्हणून ओळखले जाते. याच रिसॉर्टला पर्यटकांची मोठी पसंती असल्याने सर्वप्रथम येथे बॅटरी कार आणण्याचा निर्णय एमटीडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.
बॅटरी कारमुळे पर्यटक होणार आकर्षित
बॅटरी कार चार्जिंगवर चालणारी असून सुमारे 5 तास चार्ज करावी लागते. या कारमध्ये 7 आसन क्षमता आहे. गणपतीपुळेत बोट क्लबचा साहसी जलपर्यटनाचा पर्यटनाचा उपक्रम सुरू केल्यानंतर आता बॅटरी कारही आणल्याने गणपतीपुळे एमटीडीसी पर्यटक निवास पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.