वार्ताहर/ गणपतीपुळे
घटस्थापनेपासून राज्यात मंदिरे उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिल्यामुळे सध्या मंदिरे उघडण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी केली जात आहे. सुप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरातही त्यासाठी तयारीची लगबग पाहायला मिळत आहे.
येथील देवस्थान पंचकमिटीकडून अतिशय चोख नियोजन केले जात आहे. रविवारपासून मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर ला मंदिर उघडताना दर्शनासाठी येणाऱया भाविकांसाठी गणपतीपुळे मंदिर प्रशासन सज्ज होत आहे. मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी सध्या देवस्थानचे पंधरा ते वीस कर्मचारी कामात गुंतलेले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वयंभू गणेश मंदिर बंद होते. 15 ऑगस्टपासून पर्यटनस्थळे खुली झाल्यानंतर भाविक व पर्यटक येथे येऊ लागले. मात्र मंदिर बंद असल्याने श्रीं च्या दर्शनाचा लाभ मिळत नव्हता. येथे येणारे भक्त कळस दर्शन व प्रवेशद्वारावर टीव्ही क्रीनवर गणपती मूर्तीचे दर्शन घेऊन परतत होते. परंतु आता सात ऑक्टोबरपासून मंदिर सुरू होणार असल्याने भक्तांना श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
देवस्थानतर्फे लाडू प्रसाद प्रसाद वाटप!
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंदिर 7 ऑक्टोबर पासून नवरात्रीच्या अर्थात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार असल्याने लाखो भाविकांमधून आनंद व्यक्त होत आहे. यानिमित्त गणपतीपुळे देवस्थान पंचकमिटीकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यानुसार देवस्थान पंच कमिटीने शनिवारपासून गणपतीपुळे मंदिर परिसरात लाडू प्रसाद सुरू केला आहे . याबद्दल समाधान व आनंद व्यक्त होत आहे. या लाडू प्रसादाचा शनिवारी विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती देवस्थान पंचकमिटीकडून देण्यात आली.