वैभव पवार/ गणपतीपुळे
कोरोना काळात येथील ‘श्रीं’च्या मंदिराच्या कळस दर्शनावरच भाविकांना सभाधान मानावे लागत आहे. त्यामुळे ‘श्रीं’चे थेट दर्शन होण्यासाठी आता गणपतीपुळे देवस्थान कमिटीने गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा टीव्ही क्रीन बसवला आहे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच प्रमुख मंदिरे सध्या बंद आहेत. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिरही बंद असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील लाखो भाविकांची निराशा झाली आहे. त्यातच सध्या शासनाने पर्यटन स्थळे खुली केल्याने विविध ठिकाणचे पर्यटक व भक्त गणपतीपुळे येथे येत आहेत. परंतु येथील मंदिरच बंद असल्याने भक्तांना मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून केवळ कळस दर्शन घेऊन परतावे लागत आहे. भक्तांची निराशा काही अंशी कमी करण्यासाठी देवस्थान कमिटीने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टीव्ही लावून गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घडविण्यास सुरुवात केली आहे.
या स्क्रीनवरून गणपती बाप्पांचे दर्शन होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गणपती मंदिर बंद असले तरी मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून लांबून का होईना मूर्तीचे दर्शन व्हावे, अशी इच्छा अनेक भक्तांनी व्यक्त केली होती.