सर्वच स्पेशल धावल्या विक्रमी गर्दीने
राजू चव्हाण/ खेड
कोरोनाच्या संकटामुळे सलग 2 वर्षे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची गावी येण्याची संधी हुकली होती. याचमुळे यंदा गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया चाकरमान्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता 13 ऑगस्टपासूनच कोकण मार्गावर चालवलेल्या ‘गणपती स्पेशल’ गाडय़ांनी गर्दीचा अन् उत्पन्नाचाही विक्रम प्रस्थापित केला. विलंबाच्या प्रवासातही शेवटच्या दिवसापर्यंत चाकरमान्यांनी सर्वच गणपती स्पेशल गाडय़ांना पसंती दिली. चाकरमान्यांच्या उदंड प्रतिसादानंतर तब्बल एका महिन्यानंतर गणपती स्पेशल गाडय़ा मंगळवारपासून यार्डात विसावल्या. सीएसएमटी-सावंतवाडी नियमित स्पेशलच्या सर्वाधिक 44 फेऱया धावल्या.
गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. कोरोनाच्या महामारीमुळे कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने सलग 2 वर्षे चाकरमान्यांनी गावाकडे पाठच फिरवली होती. यंदा मात्र नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे चाकरमान्यांना गाव गाठता आले होते. मध्य व कोकण रेल्वे प्रशासनापाठोपाठ पश्चिम रेल्वेही कोकणवासियांच्या दिमतीला धावत गणेशोत्सवात तब्बल 300हून अधिक फेऱया कोकण मार्गावर चालवल्याने चाकरमान्यांना गाव गाठणे सुकर झाले.
नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ांना तोबा गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेत रेल्वे प्रशासनानेही एकामागोमाग एक गणपती स्पेशल गाडय़ांची कृपादृष्टीच चाकरमान्यांवर केली. मात्र तरीही सर्वच गणपती स्पेशल गाडय़ांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते. जलद व एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ांच्या काही श्रेणींचे तिकीट काढताना ‘क्षमस्व’ असा संदेशही आल्याने चाकरमान्यांची कोंडी झाली होती. यानंतर नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाच रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्याने गणेशभक्तांना दिलासाच मिळाला.
गणरायाच्या दर्शनाची आस उराशी बाळगणाऱया गणेशभक्तांनी तुफानी गर्दीतूनही रेटारेटीचा प्रवास करत गाव गाठणे पसंत केले होते. परतीच्या प्रवासातही हीच परिस्थिती कायम होती. कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ांची संख्या कमालीची वाढल्याने रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. हे विस्कळीत वेळापत्रक रूळावर आणताना रेल्वे प्रशासनाची दमछाक झाली. विलंबाच्या प्रवासातही गणेशभक्तांनी गणपती स्पेशल गाडय़ांमधूनच सफर करणे पसंत केले.
13 ऑगस्टपासून गणपती स्पेशल गाडय़ा कोकण मार्गावर धावू लागल्या होत्या. सीएसएमटी-सावंतवाडी नियमित गणपती स्पेशलसह नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलला पहिला मान मिळाला होता. गणेशोत्सव कालावधीत सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशलच्या 20 ऑगस्टपर्यंत 16 फेऱया नियमितपणे चालवण्यात आल्या तर नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलच्या 6 फेऱया चालवण्यात आल्या. इतर गणपती स्पेशल गाडय़ांच्या तुलनेत 01137/01138 क्रमांकाच्या सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशलच्या 21 ते 11 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आलेल्या सर्वाधिक 44 फेऱयांना चाकरमान्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलच्या 12 फेऱया, पुणे-कुडाळ, पुणे-थिविम, पनवेल-कुडाळ स्पेशलच्या प्रत्येकी 6 फेऱया चालवण्यात आल्या. पुणे-कुडाळ स्पेशलच्या 6 फेऱया, पनवेल-कुडाळ स्पेशलच्या 4 फेऱया धावल्या. लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकूर स्पेशलच्या 11 सप्टेंबरपर्यंत 30 फेऱया धावल्या. सीएसएमटी-ठोकूर साप्ताहिक स्पेशलच्या 6 फेऱयांचाही समावेश आहे. सीएसएमटी-मडगाव गणपती स्पेशलच्या 16 फेऱया धावल्या. वांद्रे-कुडाळ स्पेशलच्याही 6 फेऱया चालवण्यात आल्या.
याशिवाय एलटीटी-मंगळूर एक्स्प्रेस, अहमदाबाद-कुडाळ एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस, उधना-मडगाव एक्स्प्रेस या जलद स्पेशल गाडय़ांच्या धावलेल्या अतिरिक्त फेऱयांमुळे चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले. एकामागोमाग एक साप्ताहिक गणपती स्पेशलही दिमतीला धावल्याने गणेशभक्तांना गाव गाठणे सुलभ झाले.
स्पेशल गाडय़ांना अखेर ‘ब्रेक’
याशिवाय कोकण मार्गावर प्रथमच चालवण्यात आलेल्या रोहा-चिपळूण मेमू स्पेशलमुळेही चाकरमान्यांच्या यातायातीला काही अंशी ब्रेक लागला. कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या सर्वच गणपती स्पेशल गाडय़ांना चाकरमान्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर 13 सप्टेंबरपासून या स्पेशल गाडय़ांना अखेर ब्रेक लागला.