बाजारपेठेला बहर : नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोटय़वधीची उलाढाल
प्रतिनिधी/बेळगाव
‘बाप्पा मोरया’च्या गजरात शुक्रवारी सर्वत्र बाप्पाचे आगमन होणार आहे. शहर गणरायांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून घरगुती तसेच सार्वजनिक पातळीवरील श्रीमूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण झाली आहे. बाप्पा येणार असल्याने सगळीकडेच उत्साह आणि आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.
पुणे, मुंबईनंतर बेळगाव येथे गणेशाचे स्वागत मोठय़ा उत्साहाने केले जाते. कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांवर निर्बंध आले असले तरी नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. अनेक भाविकांनी गुरुवारी सायंकाळीच गणेशमूर्ती आणण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला होता.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा आवाज आता कानावर पडू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून अत्यंत साध्या पद्धतीने गणेशाचे आगमन होत असले तरी त्याच्या विधीवत पूजेसाठी कोणतीही कसर राहू नये यासाठी भाविकांनी काळजी घेतली आहे. गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती.
बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण
सजावट, पूजासाहित्य, नवे कपडे आदींच्या खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याने काही रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. इलेक्ट्रिकल साहित्य, फुले, फळे, धान्य यासह आवश्यक असलेले साहित्य खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. मागील वषी कोरोनामुळे काही प्रमाणात महागाईचे सावट होते.
यावर्षीही तशीच अवस्था असली तरी खरेदीसाठी मात्र गर्दी दिसत आहे. ‘कोरोनाचे विघ्न यंदा गणराया दूर कर,’ अशीच भावना मनात आणून सारे जणच बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत.
शुक्रवारी गणरायाचे आगमन होणार आहे. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक त्या सर्व वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी भर दिला. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारुन वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांमध्ये बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोटय़वधीची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांकडून सांगण्यात आले.
सर्वच साहित्यांच्या दरात किंचित वाढ
यावर्षी खाद्य पदार्थ, सजावट साहित्य, पूजेचे साहित्य, फळ-फळावळ, फुले, अशा सर्वच साहित्यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दीचा ओघ वाढत होता. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेपासून सावध राहण्यासाठी आरोग्य खात्याकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र मोठय़ा प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर व इतर नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
खरेदीसाठी झुंबड
भक्तांसाठी बाजारपेठेत सर्वच व्यापाऱयांनी विविध वस्तू उपलब्ध केल्या होत्या. फिरते विक्रेतेही ओरडून वस्तूंची विक्री करताना दिसत होते. शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱया गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठ, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड, शनिवार खूट या परिसरात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या परिसरात नागरिकांना अक्षरशः पाऊल ठेवण्यासही जागा मिळत नव्हती. पोलिसांनी काही ठिकाणी मोठी वाहने आत येऊ नयेत, याची काळजी घेतली होती. तरीही वाहतुकीची कोंडी होतच होती. याचा फटका दिवसभरात अनेकदा बसत होता.
दिवसभरात अनेकदा वाहतुकीची कोंडी
किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गेल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनिमंदिर, रविवार पेठ, अंबाभुवन, कपिलेश्वर रोड, टिळकवाडी, खडेबाजार शहापूर आदी भागात गर्दीमुळे दिवसभरात अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांना बाजारातून बाहेर पडताना बरेच कष्ट घ्यावे लागले.
पर्यावरणपूरक गणेशपूजन आपली जबाबदारी
कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध आले आहेत. मात्र आनंद साजरा करताना त्यातून पर्यावरणाला हानी पोहोचू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
इकोप्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सवात सर्व प्रथम गणेशमूर्ती शाडू किंवा मातीची असण्यावर भर देणे आवश्यक आहे. दरम्यान सध्या सर्वत्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा बोलबाला असल्याने किमान विसर्जन करताना नैसर्गिक जलस्रोतांचे नुकसान होऊ नये. याचे भान बाळगण्याची आवश्यकता आहे. मूर्तीवर घातल्या जाणाऱया फुले व हारांचे थेट पाण्यात विसर्जन करणे, पूजेत निर्माण होणारी राख पाण्यात सोडणे आदी प्रकार थांबविणे आवश्यक आहे. गणेशाचे आगमन, आरती, पूजन व विसर्जन आदी काळात फटाक्मयांचा वापर कमी करुन पर्यावरणाला हातभार लावण्याचे उद्दिष्ट प्रत्येक गणेशभक्ताने बाळगायला हवे.
नानाविध सजावट साहित्य उपलब्ध
विविध आकर्षक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. मात्र कोरोनामुळे यावर्षी व्यापाऱयांना याचा फटका बसला असला तरी काही प्रमाणात साहित्याची उपलब्धता करुन देण्यात आली. सजावटीच्या साहित्यामध्ये आकर्षक अशी मखरे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. या मखरांमध्ये राजवाडे, सिंहासन, मंदिरे, पाळणे असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. याबरोबरच विद्युत रोषणाईमध्ये एलईडी बल्ब, प्लास्टीकच्या माळा, पडदे, विविध आकारातील फोकस, बल्ब, विद्युत माळा असे नानाविध प्रकारचे साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.
पूजेसाठी लागणाऱया फळांना मोठी मागणी
गणेशमूर्तीसमोर पाच फळे ठेवण्याचा प्रघात असल्याने पाच फळे एकत्रित विक्री केली जात आहेत. ही फळे 60 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत आकारमानानुसार उपलब्ध आहेत. बेळगाव फळ बाजारात सध्या शिमला येथून सफरचंद, आंध्रप्रदेश येथून मोसंबी व पंढरपूर, सोलापूर या भागातून डाळींब उपलब्ध करण्यात आले आहेत. याबरोबरीनेच पेरु, चिकू, सीताफळ, केळी या फळांनाही अधिक मागणी आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फिरत्या विक्रेत्यांनी रस्त्यावर हातगाडय़ा लावून फळांची विक्री सुरू केली आहे.
आकर्षणाचे केंद्रबिंदू आभूषणे
आकर्षक अशा गणेशमूर्तींबरोबरच चांदीची जास्वंदीची फुले, तुलसी हार, मोदक हार, दुर्वांचा हार, पाच, अकरा व एकवीस आकारातील मोदक, कर्ण आभूषण, त्रिशुल याबरोबरच पूजा साहित्यामध्ये हळदी, कुंकवाचे करंडे, ताम्हण, समई, पळी, पंचपात्र, पानसुपारी, कलश व गणरायाचा लाडका उंदीरमामाही चांदीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.