प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या धास्तीत सुरू झालेल्या एसएसएलसी परीक्षेचा दुसरा पेपर शनिवारी पार पडला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कठीण वाटणारा गणितचा पेपर शनिवारी झाल्याने एसएसएलसीचे निम्मे टेन्शन दूर झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. गणित विषयाच्या पेपरसाठी प्रामुख्याने सराव आणि सातत्य असणे आवश्यक आहे. मात्र तीन महिने परीक्षा लांबणीवर पडल्याने गणितचा पेपर कसा जाईल या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर देताच सुटकेचा निःश्वास सोडला. परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाचे आव्हान स्वीकारत कोरोनाच्या धास्तीत स्वअध्ययनावर भर देत विद्यार्थ्यांनी गणितचा पेपर सोडवला. यामुळे विद्यार्थ्यांच्या नावडीचा अवघड वाटणारा पेपर अखेर बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपानुसार पार पडला.
2019-2020 या शैक्षणिक वर्षात प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले असल्याने उपयोजनात्मक दीर्घोत्तरी प्रश्नावर भर देण्यात आला होता. यामुळे कोरोना आणि प्रश्नपत्रिकेचे बदलले स्वरुप या दुहेरी संकटात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा गणित पेपर मात्र समाधानकारक होता. पेपर अवघड नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. 3 तास 15 मिनिटांच्या कालावधीत गणितचा पेपर पार पडला. यामुळे गणितचा पेपर सकाळी 10. 30 ते 1. 45 दरम्यान पार पडला.
चौकट
800 विद्यार्थी गैरहजर
गणित विषयाच्या पेपरसाठी एकूण 32 हजार 306 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात 31 हजार 506 विद्यार्थ्यांनी गणित विषयाचा पेपर दिला असून 800 विद्यार्थ्यांनी दुसऱया पेपरला दांडी मारली आहे. यामुळे गणितच्या पेपरला एकूण 97. 52 टक्के विद्यार्थी हजर असल्याचे नोंदविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर पाळले केंद्रावर प्रवेश करण्यापासून परीक्षा केंद्रावरुन बाहेर पडेपर्यंत विद्यार्थ्यांची खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरा पेपरदेखीत सुरळीत पार पडला. यावेळी गर्दी टाळणे व सामाजिक अंतर राखणे यासाठी सूचना देण्यात येत होत्या. मात्र पालकांना याचे भान उरले नसल्याचे दिसून येत आहे. पेपर सुटण्यापूर्वी पालक परीक्षा केंद्रावर गर्दी करत असून यामुळे केंद्राबाहेर अक्षरशः सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. गणितचा पेपर झाल्यानंतर देखील केंद्राबाहेर पालकांची गर्दी झाल्याने गोंधळाची परिस्थती निर्माण झाल्याचे दिसून आले