ऑनलाईन टीम / पुणे :
‘इतर विषयांप्रमाणे गणित विषयाची उत्तरे त्याच पानावरील परिच्छेदात दिलेली नसतात, गणिताची उत्तरे गणित सोडवून शोधायची असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती जागी केली पाहिजे. पाठांतराद्वारे पाढे पाठ करून गणिताची भीती घालवली पाहिजे. एकंदरीतच गणित ही अखंड शोधयात्रा आहे, असे प्रतिपादन मंदार नामजोशी यांनी केले.
गणिताची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ‘अंकनाद’ या ॲप तर्फे ‘पाठांतराचे संस्कार’ या विषयावर 2 दिवसीय विनामूल्य वेबिनारचा आज प्रारंभ झाला. यावेळी अंकनादचे प्रणेते मंदार नामजोशी यांनी ‘संगीतबद्ध पाढे पाठांतर प्रणाली’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मंदार नामजोशी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कानावर काय पडावे याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. घोकंपट्टी आणि पाठांतराचा संस्कार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अपूर्णांकाचे पाढे ही संकल्पना जगात कोणत्याही भाषेत नाही. हे अपूर्णांकाचे पाढे मराठी भाषेत आहेत,ते जगभर नेण्याचा प्रयत्न आम्ही ‘अंकनाद’ या ॲप तर्फे करीत आहोत.
पाढे पाठांतर स्पर्धा आणि गणितालय या संकल्पनांची माहिती मंदार नामजोशी यांनी दिली. प्राची साठे म्हणाल्या, गणित ही आपली परंपरा आहे. पावकी, निमकी, सवायकि सारखे पाढे हा आपला ठेवा आहे. ती जपली पाहिजे. त्यासाठी कृतियुक्त शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे.