प्रतिनिधी / बेळगाव
गणेबैल (ता. खानापूर) येथे उसाच्या शेतात नागसाप शेतकऱयांना आढळून आला. इदलहोंड येथील सर्पमित्र सातेरी विठ्ठल सुतार यांनी या सापाला पकडून त्याला जीवदान दिले. हा साप त्यांनी नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडला.
सध्या उन्हाचे दिवस असल्याने साप बाहेर पडू लागले आहेत. याचा सर्वाधिक धोका शेतकरीवर्गाला बसू लागला आहे. शेतामध्ये गेलेल्या शेतकऱयांना सापांचा सामना करावा लागत आहे. बऱयाचवेळी उसाला पाणी देताना शेतकऱयांचा धक्का लागून सर्पदंश होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. गणेबैल येथील एका शेतात नागसाप आढळून आल्याने शेतकऱयांनी तात्काळ सर्पमित्र सातेरी सुतार यांना ही माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.