वार्ताहर / हिंडलगा
कोरोना महामारीमुळे देशभरातील जनतेला मोठय़ा संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत आपल्या मतदारसंघातील जनता सुरक्षित राहिली पाहिजे. या उद्देशाने बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गणेशपूर येथील स्मशानभूमीत श्रमदानाने स्वच्छता अभियान राबविले.
सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार माजवला आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जनतेची ही समस्या लक्षात घेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये गरजू व गरीब लोकांना जीवनोपयोगी साहित्यासह कोविड-19 आयसोलेशन किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तर त्यांच्या या कार्याला पाठिंबा देत त्यांचे सुपुत्र व युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी आपल्या कार्यकत्यासमवेत रविवारी (दि. 6) गणेशपूर येथील झाडाझुडपांनी वेढलेल्या स्मशानभूमिची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बेनकनहळ्ळी ग्रा. पं. सदस्य मोहन सांबरेकर, सुनील सुर्वे, राहुल कनगुटकर, प्रदीप तांजी, दिनेश लोहार राजू दंडगलकर, पिंटू देसाईसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.