स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा तपास, 64 हजारांचे चांदीचे दागिने हस्तगत, कोल्हापूर
प्रतिनिधी/कोल्हापूर
गणेशमूर्तीवरील चांदीचे दागिने चोरणाऱया चोरटय़ास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सुयश उर्फ वरुण महेश हुक्केरी (वय 19, रा. 711 ए वॉर्ड राजाराम चौक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 किलो 381 ग्रम वजानाची 64 हजार 907 रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, राजाराम चौक येथील राजाराम चौक मित्र मंडळाने प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीच्या अंगावरील दागिनी 15 सफ्टेंबर रोजी पहाटे अज्ञात चोरटय़ाने लंपास केले. मंडळाने याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही याप्रकरणी तपास सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना सुयश हुक्केरी याने गणशमूर्तीवरील दागिने चोरल्याची गोपनिय सुत्राकडून माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संबंधित युवकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. कदम खणीजवळ लपवलेले गणेशमूर्तीचे दोन चांदीचे कंडे, चार अंगठय़ा असे दागिने पथकाकडे दिले.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक फौजदार अजय गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, हेड काॅन्स्टेबल विजय कारंडे, पांडूरंग पाटील, पोलीस नाईक किरण गावडे, कुमार पोतदार, काॅन्सटेबल प्रदीप पोवार, रवी पाटील यांनी तपास केला.