तन्मय दाते/ रत्नागिरी
रत्नागिरी – गणेशोत्सवाला कोकणात अनन्य साधारण महत्त्व आहे. गणेशोत्सव अवघा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. मात्र, यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेश मूर्तीशाळांवर सुद्धा कोरोनाचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळेच सध्या मूर्तीशाळांमध्ये सुद्धा विशेष खबरदारी घेतली जात आहे. मूर्तीशाळांमध्ये लावण्यात आलेल्या सूचनांच्या पाटय़ा सध्या लक्षवेधी ठरत आहेत.
कोकणात गौरी-गणपतीचा सण प्रत्येक घरात मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील घरगुती गणेशोत्सवाचे स्वरूपही सार्वजनिक गणेशोत्सवासारखे असते. गणेशोत्सवासाठी देशाच्या कानाकोप्रयात कुठेही असलेला कोकणीमाणूस आपल्या गावी परत येतोच. यावर्षी मात्र, कोरोनाचा गणेशोत्सवाच्या तयारीवर परिणाम दिसत आहे.
सध्या गणेश मूर्तीशाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग दिसत आहे. विविध आकारातील सुबक गणेशमूर्ती घडवण्याची कामे सुरू आहेत. अनेक मूर्तीशाळांमध्ये मूर्तीकाम अंतिम टप्प्यात आहे. जिह्यात प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवल्या जातात. शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने अनेकांची पसंती याच मूर्तींना असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती शाळांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मूर्ती शाळेमध्ये येणाया भाविकांसाठी सक्त सूचना दिल्या जात आहेत. शिवाय सुचनांच्या पाटय़ाही लावण्यात आल्या आहेत.
गणेश मूर्तीशाळांच्या बाहेर ’मास्क शिवाय आत प्रवेश नाही, योग्य अंतर राखा, गणपतीचा पाट दिल्यानंतर गणपती किती तयार झाला हे पाहण्यासाठी वारंवार येवू नका, एकावेळी एकाच व्यक्तीने आतमध्ये यावे, गणपतीचा साचा मागायला येवू नये’, अशा विविध प्रकारच्या सुचना लिहिण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे यावर्षी मूर्तीशाळेत मूर्ती सजावटीसाठी येऊ नये, 10 जुलै नंतर येणायांनी तयार असलेल्या मूर्तीचीच निवड करावी, अशा सक्त सुचनाही मूर्ती शाळांमध्ये लावण्यात आल्या आहेत. भाविकही या सुचनांचे पालन करत असल्याचे मूर्तीकार सांगतात.मूर्तीकार देखील मूर्ती घडवताना सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करताना दिसत आहेत. एकूणच काय तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती शाळांमध्ये खबरदारी घेवून गणेशमूर्ती रेखाटल्या जात आहेत.