सरकारच्या निर्देशांची तालमींना प्रतिक्षा, यंदा गणेशोत्सवासोबत मोहरमही असणार
संग्राम काटकर/कोल्हापूर
गेल्या 2 वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासोबत मोहरम देखील असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचे निर्देश सरकारने घरगूती गणेशभक्त व मंडळांना भलेही दिले असले तरीही गणेशोत्सवाच्या आदल्यादिवसापासून सुरु होणारा मोहरम कसा करावा यासंदर्भातील निर्देश अद्यापही दिलेले नाहीत. यामुळे गणेशोत्सव व मोहरमही एकत्रीत साजरा करणाऱया तालमींसह घरगुती पंजाभक्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जोपर्यंत निर्देश मिळणार नाहीत, तोपर्यंत कुदळ मारणे, पंजा प्रतिष्ठापना, पंजाभेटी, खत्तलरात्र व पंजे विसर्जन आदी धार्मिक कार्यांचे नियोजन करताच येणार नाही, असे तालमीचे पदाधिकारी व घरगुती पंजाभक्त सांगत आहेत.
33 वर्षांच्या कालखंडानंतर 2018 पासून गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. लाखो हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सहभागाने गणेशोत्सव व मोहरम एकत्र साजरे करण्याचे यंदाचे सलग तिसरे व अखेरचे वर्ष आहे. 20 ऑगस्टला चंद्रदर्शन झाले तर 21 ऑगस्टपासून मोहरम सुरु होणार आहे. तसेच 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. सध्या शहरात गणेशोत्सव व मोहरम एकत्रीत साजरा करणाऱया दिडशेहून अधिक तालमीसह घरात पंजा बसविणारे भक्त आहेत. यंदा मात्र कोरोनामुळे शहरासह जिह्यात गणेशोत्सव आणि मोहरम धुमधडाक्यात साजरा करण्यावर मर्यादा आली आहे. अशा परिस्थिती गणेशोत्सवाप्रमाणे मोहरमसंदर्भात सरकारने अद्यापही निर्देश जाहीर न केल्याने तालीम व घरगुती पंजा भक्त कमालीची नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 जुलै रोजी सरकारने गणेशोत्सवासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार जिह्यातील सर्वच मंडळांनी गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक न काढण्याचे पक्के केले आहे. मात्र मोहरमबाबत सरकारने निर्देश जाहीर न केल्याने कुदळ मारणे, पंजा प्रतिष्ठापना, पंजाभेटी, खत्तलरात्र व पंजे विसर्जन आदी धार्मिक विधी किती जणांच्या उपस्थितीत पार पाडायचे याची चिंता तालमींना सतावत आहे. पंजा प्रतिष्ठापनेच्या पाचव्या दिवसांपासून खत्तलरात्रीपर्यंत सुरु राहणाऱया पंजाभेटी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घडवायच्या की नाही, खत्तलरात्रीच्या विधीवेळी पंजासाठी जरी पटके स्वीकारायचे की नाही हाही प्रश्न तालीम संस्थासमोर उभा आहेच. त्यामुळे तालमींना जोपर्यंत निर्देश मिळणार नाहीत, तोपर्यंत एकुणच मोहरमचे त्यांना नियोजन करताच येणार नाही, हे उघड सत्य आहे.
निर्देशानुसार तालमी कार्यकर्त्यांची टिम तयार करतील…
हिंदू-मुस्लिमांमधील भाईचारा अधिक घट्ट व्हावा यासाठी सर्वच तालीम संस्था गणेशमूर्ती व पंजांची प्रतिष्ठापना अगदी जवळ-जवळच करत असतात. शिवाय गणेशमूर्ती व पंजांच्या धार्मिक विधीसह देखभालीची जबाबदारी देखील कार्यकर्ते स्वतःहून स्वीकारत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोहरमसंदर्भात लवकर निर्देश जाहीर केल्यास गणेशोत्सव व मोहरमच्या विधीसाठी तालमींना निवडक कार्यकर्त्यांची टिम तयार करण्यास वेळ मिळेल. – अमित चव्हाण (अध्यक्ष : बाबुजमाल तालीम मंडळ)