गणाचारी गल्ली मंडळाचा उपक्रम, मंडळांबरोबर अधिकाऱयांची चर्चा सुरूच,
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस अधिकाऱयांनी मंडळांच्या पदाधिकाऱयांशी चर्चा सुरूच ठेवली आहे. राज्य सरकारने दोन नियम शिथिल केल्यामुळे पदाधिकाऱयांना त्याची कल्पना देण्यासाठी बुधवारी दुपारी बैठक घेण्यात आली. याबरोबरच अनेक मंडळांनी यंदा विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या उपस्थितीत मार्केट एसीपी कार्यालयात गणेश महामंडळ पदाधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी आदींसह शहरातील बहुतेक अधिकारी व तिन्ही महामंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीनुसार गणेशोत्सव साजरा करावा. नियम मोडणाऱयांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिला. सरकारने जारी केलेली मार्गसूची जनतेच्या हितासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.
याआधी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीमध्ये किंचित बदल करण्यात आला आहे. ज्या परिसरात मंदिरे नाहीत अशा परिसरात छोटे मंडप उभारता येणार आहेत. विसर्जनासंबंधीचा निर्बंधही सरकारने शिथिल केला आहे. याव्यतिरिक्त कोणतेही बदल असणार नाहीत. मूर्तींची उंची, रोषणाई आदींना फाटा देणे गरजेचे आहे. यंदा मिरवणूकही असणार नाही, असे बैठकीत अधिकाऱयांनी सांगितले.
मंदिरात श्री मूर्तीची प्रति÷ापना करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नाही. मात्र, यासंबंधी संबंधित पोलीस स्थानकाला माहिती देणे बंधनकारक आहे. मास्क, सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. श्री मूर्तीच्या विसर्जनावेळी वाहनावर केवळ पाच जण राहता येणार आहेत. मात्र, तेही मिरवणुकीने जाता येणार नाही. लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन सीमा लाटकर यांनी केले.
या बैठकीनंतर खडेबाजार पोलिसांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळांची समादेवी मंगल कार्यालयात बैठक घेऊन मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सवात आरोग्य उत्सव
गणाचारी गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समादेवी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱयांनी दिली. या निर्णयाबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱयांचा गौरव करण्यात आला. गणेशोत्सवाला लागणारा खर्च यंदा नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. उत्सवाच्या काळात फ्लू क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. या क्लिनिकला येणाऱयांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या क्लिनिकमध्ये तज्ञ डॉक्टरांकरवी तपासणीची सोय करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी मार्गसूची जारी
मंगळवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी गणेशोत्सवासाठी मार्गसूची जारी केली आहे. मंगळवारपासूनच ती अंमलात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.